India Vs Pakistan : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (LOC) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार झाला, परंतु त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताची कारवाई, पाकिस्तानचा तिळपापड
पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचा शिमला करार आणि इतर द्विपक्षीय करार स्थगित केले. सर्व व्यापारावर बंदी घातली आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली. यासोबतच, सिंधू जल करारांतर्गत दिलेला पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा किंवा बदलण्याचा कोणताही प्रयत्न युद्ध पुकारण्यासारखा मानला जाईल, असेही पाकिस्तानने म्हटलं आहे.
पाकिस्तानने सीमेवर सुरक्षा वाढवली
पाकिस्तानने वाघा बॉर्डर क्रॉसिंग देखील बंद केली. सार्क व्हिसा एक्झम्पशन स्कीम (SVES) अंतर्गत भारतीय नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा निलंबित केले आणि भारतीय उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांना निघून जाण्यास सांगितले. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या घोषणा करण्यात आल्या.
( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार; भारताचे 5 निर्णय पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणार )
भारताने पाकिस्तानचं पाणी रोखलं
पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने बुधवारी 1960 मधील सिंधू जल करार स्थगित केला. पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याची घोषणा केली. भारताने सिंधु पाणी करार स्थगित करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद, पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार, भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.