JEE Advanced 2026 Result: जेईई ॲडव्हान्स्ड 2026 (JEE Advanced 2026) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी आयआयटी (IIT) दिल्ली झोनच्या तीन उमेदवारांनी कॉमन रँक लिस्टमध्ये टॉप 3 रँक पटकावले आहेत. जेईई ॲडव्हान्स्ड 2026 मध्ये आयआयटी दिल्ली झोनच्या शुभम कुमारने ऑल इंडिया रँक (AIR) 1 म्हणजे अव्वल स्थान मिळवले आहे. तर महिलांमध्ये आरोही देशपांडे या विद्यार्थिनीने अव्वल स्थान पटकावले आहे. अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार (प्रेस रिलीज), आयआयटी दिल्ली झोनच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर कबीर छिल्लर आणि जतिन चाहर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. 1 जून रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कबीर छिल्लरने एकूण 360 गुणांपैकी 329 गुण मिळवले आहेत. तर तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या जतिन चाहरने 319 गुण मिळवले आहेत. विद्यार्थिनींमध्ये अव्वल आलेल्या आरोही देशपांडे हिने 280 गुण मिळवले आहेत.
एकूण किती विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली
यावर्षी जेईई ॲडव्हान्स्ड 2026 परीक्षेसाठी एकूण 1 लाख 87 हजार 389 अर्ज आले होते. तर परीक्षेला 1 लाख 79 हजार 694 विद्यार्थी उपस्थित राहिले होते. ही परीक्षा 17 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. तसेच 1 जून रोजी जाहीर झालेल्या जेईई ॲडव्हान्स्ड 2026 परीक्षेच्या निकालानुसार, परीक्षेत बसलेल्या उमेदवारांपैकी 56 हजार 880 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या 56 हजार 880 उमेदवारांमध्ये 10 हजार 107 विद्यार्थिनींचा समावेश आहे.
यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स्ड 2026ची परीक्षा दिली आहे, ते जेईई ॲडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले स्कोअरकार्ड पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर आवश्यक आहे.