Jeet Adani Wedding : अदाणी समुहाचे संचालक गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा मुलगा जीत अदाणी यांचं 7 फेब्रुवारी रोजी लग्न होणार आहे. सूरतमधील हिरे व्यापारी जेमीन शाह यांची मुलगी दिवा शाह यांच्याशी जीत यांच लग्न होणार आहे. या दोघांचा 2023 मध्ये साखरपुडा झाला होता. जीत अदाणी यांच्या लग्नाबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत होते. हे लग्न सोशल मीडियाच्या उत्सुकतेचा विषय बनलाय. या लग्नातील पाहुण्यांबाबतही वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या गौतम अदाणी यांनी हे लग्न कसं होणार? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं होणार लग्न?
जीत अदाणी यांचं लग्न साध्या आणि पारंपारिक पद्धतीनं होणार असल्याचं गौतम अदाणी यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केले. जीत यांचं लग्न हे 'सेलिब्रेटींचे महाकुंभ' असेल का? असा प्रश्न अदाणी यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी 'निश्चितच नाही' असं स्पष्ट केलं. या उत्तराबरोबरच या विषयावर सोशल मीडियावर सुरु असलेल्या वेगवेगळ्या अफवांना अदाणी यांनी पूर्णविराम दिला आहे.
काय होती चर्चा?
जीत अदाणी यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा आणि अफवा सुरु आहेत. जीत अदाणी आणि दिवा शाह यांच्या लग्नाला एलॉन मस्क, मार्क झकरबर्ग,डॅनियल क्रेग, टेलर स्विफ्ट, जस्टीन बिबर कान्ये वेस्ट, कार्दशियन सिस्टर्स, राफेल नदाल दिलजीत दोसांज, सुंदर पिचई, सत्या नडेला, बिली इलिश हे दिग्गज उपस्थित राहणार आहेत, अशी चर्चा सुरु होती.
( नक्की वाचा : Gautam Adani at Mahakumbh : गौतम अदाणी यांनी त्रिवेणी संगमावर केली पूजा, गंगा मातेचा घेतला आशीर्वाद )
काही सोशल मीडिया युझर्सनी तर किंग चार्ल्स आणि पोप देखील सहभागी होणार असा दावा केला होता. इतकंच नाही तर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर होणारी वन-डे मॅच देखील या लग्नासाठी दुसरीकडं हलवण्यात आली आहे, अशी अफवा होती. या लग्नात 1,000 सुपर कार, शेकडो प्रायव्हेट जेट्स, 58 देशांचे शेफ सहभागी होणार असून याचा खर्च एकूण 10,000 कोटी रुपये असल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.
गौतम अदाणींनी फेटाळली चर्चा
गौतम अदाणी मंगळवारी (21 जानेवारी) प्रयागराजमधील महाकुंभात सहकुटुंब उपस्थित होते. त्रिवेणी संगमावर गंगा आरती केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिलं. माझे संगोपन आणि काम करण्याची पद्धत ही सामान्य व्यक्तींप्रमाणे आहे. जीत देखील इथे गंगा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. हे लग्न साध्या पद्धतीनं आणि कौटुंबीक वातावरणात होणार आहे, असं अदाणी यांनी स्पष्ट केलं.
गौतम अदाणींसोबत यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती अदाणी, मुलगा करण आणि जीत तसंच सून पारिधी आणि नात कावेरी अदाणी उपस्थित होते. अदाणी कुटुंबीय इस्कॉनमधील महाप्रसाद सेवेतही सहभागी झाले होते. महाकुंभात सहभागी होणाऱ्या एक लाख भाविकांना रोज इथं प्रसादाचे वाटप केले जाते. गौतम अदाणी यांनी यावेळी महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मोदी सरकार आणि योगी सरकारचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर महाकुंभाचे व्यवस्थापन हा मॅनेजमेंट संस्था आणि कॉर्पोरेट उद्योगांचा अभ्यासाचा विषय आहे, असं त्यांनी स्पष्ट केले.