राज्यसभेत गुरुवारी वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा अहवाल (Waqf Bill JPC Report) मांडण्यात आला. या अहवालावरून राज्यसभेत (Rajya Sabha Updates) जबरदस्त गदारोळ झाला. राष्ट्रपतींचा संदेश नीट वाचू न दिल्याने राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड हे आधीच संतापलेले होते, त्यातच हा गदारोळ झाल्याने सदनाचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले होते. 10 मिनिटांनंतर कामकाजाला सुरूवात झाल्यानंतरही विरोधकांकडून होणारा गदारोळ सुरूच राहिला. हे विधेयक पुन्हा जेपीसीकडे पाठविण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. खरगे यांनी आरोप केला आहे की या अहवालातून काही गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत. विधेयकासंदर्भात असलेले समितीतील सदस्यांचे मतभेदही अहवालासोबत मांडण्यात यावेत असे खरगे यांनी म्हटले. असे होत नसेल तर हा अहवाल बोगस मानू असे खरगेंनी म्हटले. या विधेयकावरून सभापती धनखड आणि खरगे यांच्यात जबरदस्त वाकयुद्ध रंगलेले पाहायला मिळाले.
अहवाल सादर होताच गोंधळाला सुरुवात
राज्यसभेत वक्फ विधेयकासंदर्भातील जेपीसीचा अहवाल सादर करण्यात आला, त्याक्षणापासून गोंधळाला सुरुवात झाली. विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडण्याचा प्रयत्न केला. सभापती धनखड यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. विरोधकांच्या गदारोळादरम्यानच धनखड यांनी राष्ट्रपतींचा संदेश वाचून दाखवण्यास सुरूवात केली. संदेश वाचून दाखवत असतानाही गोंधळ सुरू असल्याने धनखड नाराज झाले होते. विरोधकांची ही कृती राष्ट्रपतींचा अपमान असल्याचे धनखड यांनी म्हटले. विरोधकांचा गोंधळ कमी होत नसल्याने कामकाज स्थगित करावे लागले.
सभ्यपणा शिकणे गरजेचे आहे!
सदनाची कारवाई पुन्हा सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ करायला सुरुवात केली. यामुळे नाराज झालेल्या सभापतींनी विरोधकांना इशारा दिला आणि म्हटले की तुम्ही सभ्यपणा शिकणे गरजेचे आहे. या तिखट शाब्दीक युद्धादरम्यान काही हलके फुलके प्रसंगही अनुभवायला मिळाले. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापती धनखड यांना उद्देशून म्हटले की, " आम्ही खासदार असून, आम्हाला वारंवार धमकावलं जात आहे." यावर धनखड यांनी म्हटले की, तुम्हाला राग आला तर मला त्रास होईल. धनखड यांनी विरोधकांना उद्देशून म्हटले की सोनिया गांधी सदनात बोलत असताना सगळेजण शांतपणे ऐकत होते. इतर सदस्य बोलत असतानाही अशाच पद्धतीची शांतता राखली गेली पाहीजे. यावरून खरगे यांनी धनखड यांची फिरकी घेत म्हटले की, मी तुमचा सल्ला ऐकतोच मात्र नड्डा यांनी त्यांच्या सदस्यांवर नियंत्रण ठेवायला हवे.
अहवाल बोगस असल्याचा आरोप
खरगे यांनी आरोप केला की, वक्फ बोर्ड विधेयकाबाबतच्या जेपीसीच्या अहवालात अनेक सदस्यांनी असहमती नोटीस दिली आहे. ही नोटीस दिलेली असतानाही सदनातील कामकाजातून वगळणं, फक्त बहुसंख्य सदस्यांचे विचारच मांडणे हे लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. खरगे यांनी म्हटले की असमतीच्या नोटीस देखील रिपोर्टसोबत सादर करायला हव्या होत्या. त्या वगळून अहवाल सादर केला गेल्याने मी याची निंदा करतो असे खरगे यांनी म्हटले आहे.