पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या ज्योती मल्होत्राची पोलिसांकडून सतत चौकशी सुरू आहे. याच दरम्यान, ज्योतीच्या वडिलांनी वृत्तसंस्था आयएनएसशी बोलताना अनेक मोठे खुलासे केले आहेत. ज्योतीच्या वडिलांनी सांगितले की त्यांचे घर त्यांच्या भावाच्या पेन्शनवर चालते. घराची परिस्थितीही फारशी चांगली नाही. इतकेच नव्हे तर आपली मुलगी ज्योती घरातून बाहेर पडताना आपण 'दिल्लीला जात आहे' असे सांगून जात होती असं ही त्यांनी सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्योतीचे वडील म्हणाले की, "ती रात्री 2 वाजता पोलिसांसोबत आली होती. घरातून ती फक्त कपडे घेऊन गेली. पण तिच्याशी काही बोलणं झालं नाही. ना ज्योतीशी यापूर्वी काही बोलणं झालं होतं, ना नंतर काही बोलणं झालं. ती फक्त नमस्ते करते असं तिच्या वडीलांनी सांगितलं. ज्योती दिल्लीला जात आहे असं सांगून जायची. पण ती नेमकी कुठे जात होती हे मला माहित नव्हतं असं ही तिचे वडील सांगतात. आमचं घरसुद्धा भावाच्या पेन्शनवर चालतं. आमच्याकडे ना आधी पैसे होते ना आता आहेत. जी काही पेन्शन येते, फक्त त्यावरच घर चालतं. असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
पुढे ते म्हणाले की "आमच्या घरी तर कोणी येत ही नाही. मुलगी ज्योती नेहमी घरी ये जा करत असे. जास्त वेळ ती बाहेरच असेल. घरी येताना ती बस ने यायची की ट्रेनने हे ही आम्हाला माहित नाही असं ही ते म्हणाले. मुलीला अटक झाली आहे. पण तिच्यासाठी वकील करायचा की नाही याबाबत काहीही बोलणं झालेलं नाही. शिवाय पुढे काय करायचं आहे किंवा काय होणार आहे याचा आपल्याला अंदाजही नाही असे ही ज्योतीचे वडील म्हणाले.
16 मे रोजी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल एफआयआरनुसार, 2023 मध्ये ज्योती मल्होत्रा पाकिस्तान उच्चायुक्तालयात एहसान-उर-रहीम उर्फ दानिशच्या संपर्कात आली होती. त्यानंतर ती पाकिस्तानला फिरायला जाण्यासाठी व्हिसा घेण्यासाठी गेली होती. या एफआयआरनुसार ज्योती मल्होत्राने दोनदा पाकिस्तानचा दौरा केला होता. या पाकिस्तान भेटीत तिने दानिशच्या परिचयाचा असलेल्या अली अहवान याची पाकिस्तानमध्ये भेट घेतली होती. त्यानेच तिच्या राहण्याची व्यवस्था केली होती. ज्योती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अनेक वेळा दानिशला भेटली आहे. ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोकांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. आयएसआयला तिने अनेक गोपनिय माहिती पुरवल्याचाही तिच्यावर ठपका आहे.