Kedarnath Dham : केदारनाथ धाममधून बर्फ गायब झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डिसेंबर महिना अर्धा संपला तरी बाबा केदारची नगरी अद्याप बर्फाविना कोरडी आहे. दरवर्षी या काळात केदारनाथमध्ये 5 फुटांहून अधिक बर्फाचा थर साचलेला असायचा, मात्र यंदा निसर्गाच्या बदललेल्या चक्राने वैज्ञानिक आणि स्थानिक नागरिकांना बुचकळ्यात टाकले आहे. बर्फ नसल्यामुळे धाममधील विकासकामे जरी सुरू असली, तरी कडाक्याच्या थंडीमुळे मजुरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हवामानातील बदलाचा केदारनाथला फटका
केदारनाथ धाममध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदाचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. या ठिकाणी शेवटची बर्फवृष्टी 20 नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर डिसेंबरचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी आजूबाजूच्या शिखरांवर बर्फाचा पत्ता नाही.
या कोरड्या थंडीमुळे रात्रीचे तापमान -10 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जात आहे. सकाळी 10 वाजता ऊन पडते आणि दुपारनंतर लगेच गायब होते, त्यामुळे तिथे काम करणाऱ्या सुमारे 150 मजुरांना दिवसातून केवळ 5 ते 6 तास काम करणे शक्य होत आहे.
(नक्की वाचा : Mahakal : उज्जैन महाकाल मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, मशीद समितीचा दावा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला )
'त्या' दगडांतून साकारली भव्य केदारपुरी
2013 च्या भीषण आपत्तीवेळी चौराबाडी येथून वाहून आलेले प्रचंड दगड आता केदारपुरीचे सौंदर्य वाढवत आहेत. ज्या दगडांनी एकेकाळी विनाश घडवला होता, त्यांनाच आता कलाकुसरीने नटवले जात आहे.
या विशाल दगडांना तराशून त्यावर अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक कलाकृती कोरल्या जात आहेत. रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी प्रतीक जैन यांनी सांगितले की, भाविक जेव्हा दर्शनासाठी येतील, तेव्हा त्यांना या कलाकृतींमधून एक वेगळा आणि अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव मिळेल.
दगडांवर कोरली देवांची वेगवेगळी रूपे
धाममधील या दगडांवर मंदिर, गोमाता, भगवान गणेश, शंकर, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा कोरल्या जात आहेत. यासोबतच ऋषीमुनींची चित्रे आणि विविध आसनांमधील देवी-देवतांच्या मुद्रा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. इतकेच नाही तर पाच पांडव आणि विविध पशु-पक्षांच्या कलाकृतीही साकारण्यात आल्या आहेत. या सर्व कामांमुळे केदारपुरीचा परिसर पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि देखणा दिसत आहे.