जाहिरात

Kerala CM: केरळचा मुख्यमंत्री ठरला! दिल्लीतील खलबतं संपली, 'या' बड्या नेत्यावर हायकमांडचं शिक्कामोर्तब?

Kerala CM: केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष तिथल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे लागलं आहे.

Kerala CM: केरळचा मुख्यमंत्री ठरला! दिल्लीतील खलबतं संपली, 'या' बड्या नेत्यावर हायकमांडचं शिक्कामोर्तब?
Kerala CM: काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्रिपदासाठी नाव जवळपास निश्चित केलं आहे.
मुंबई:

Kerala CM: केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष तिथल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे लागलं आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये फक्त केरळमध्ये काँग्रेस आघाडीने दणदणीत विजय मिळवलाय. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून तीन दावेदारांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती, मात्र आता या शर्यतीत एका नावावर जवळपास मोहोर उमटली आहे.

कुणाचे नाव आघाडीवर?

NDTV ला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि लोकसभा खासदार केसी वेणुगोपाल हे केरळचे पुढचे मुख्यमंत्री असू शकतात. तीन दिग्गज नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू असताना केसी वेणुगोपाल यांनी बाजी मारल्याचे समजते. केरळमधील 63 काँग्रेस आमदारांपैकी बहुतेकांनी वेणुगोपाल यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. काँग्रेस हायकमांडने इतर दोन दावेदारांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याची तयारीही केली आहे.

( नक्की वाचा : विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग 'या' तांत्रिक अडचणीत अडकला; 234 जागा आणि 'फ्लोर टेस्ट'चं नेमकं गणित काय? )

मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सविस्तर रिपोर्ट

केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसने अजय माकन आणि मुकुल वासनिक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. या निरीक्षकांनी केरळचे प्रभारी दीपा दासमुंशी यांच्यासह पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपला सविस्तर अहवाल सादर केला आहे. 

अजय माकन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही केरळमधील प्रत्येक काँग्रेस आमदाराशी वैयक्तिक चर्चा केली आहे. मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्यासाठी एक ओळीचा ठरावही मंजूर करण्यात आला असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.

( नक्की वाचा : Bengal Election 2026: बंगालमध्ये कमळ फुलताच मोदींना झाली 'त्यांची' आठवण; कोण होते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी? )

आमदारांचा मोठा पाठिंबा

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांच्या पसंतीच्या यादीत केसी वेणुगोपाल यांचे पारडे जड दिसत आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, वेणुगोपाल यांच्याकडे 46 आमदारांचा पाठिंबा आहे. 

तर दुसरीकडे वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला यांच्या बाजूने केवळ 8 आमदार उभे आहेत. विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीसन यांना फक्त 6 आमदारांनी पसंती दर्शवली आहे. तीन आमदारांनी हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे सांगितले आहे. या आकडेवारीवरून केसी वेणुगोपाल यांचे मुख्यमंत्री होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

शपथविधीची तारीख आणि खास पाहुणे

केरळच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे रोजी पार पडण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. 

विशेष म्हणजे, तामिळनाडू निवडणुकीत मोठे यश मिळवणाऱ्या पक्षाचे प्रमुख थलापती विजय यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवले जाण्याची शक्यता आहे. शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते, ज्यामुळे केरळमधील राजकीय सस्पेन्स संपेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com