जाहिरात

Kurnool Bus Accident: 234 स्मार्टफोन्स ठरले 19 प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत; बस दुर्घटनेतील धक्कादायक खुलासा

Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशातील कर्नूल बस अपघात (Kurnool Bus Accident) प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Kurnool Bus Accident: 234 स्मार्टफोन्स ठरले 19 प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत; बस दुर्घटनेतील धक्कादायक खुलासा
Kurnool Bus Fire: कर्नुलमध्ये खासगी कंपनीची बस जळाल्यानं 19 प्रवाशांचा मृत्यू झाला.
मुंबई:

Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशातील कर्नूल बस अपघात (Kurnool Bus Accident) प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारच्या सकाळी हा भीषण अपघात झाला, तेव्हा बसमध्ये तब्बल 234 स्मार्टफोन्सचे (Smartphones) पार्सल होते. त्याची एकूण किंमत 46 लाख रुपये होती. या स्मार्टफोन्सच्या बॅटरी फुटल्यामुळे आगीची तीव्रता वाढली आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली, यात 19 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

स्मार्टफोन बॅटरीमुळे वाढला आगीचा भडका

फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान बसमध्ये असलेल्या या 234 स्मार्टफोन्सच्या बॅटरी फुटल्या. या बॅटरीच्या स्फोटामुळे आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आणि बसने अल्पावधीतच पेट घेतला. हैदराबादमधील मंगानाथा नावाच्या एका व्यापाऱ्याने हे स्मार्टफोन बेंगळुरू येथील एका ई-कॉमर्स कंपनीकडे (E-commerce Company) पार्सल म्हणून पाठवले होते, जिथून ते ग्राहकांना पुरवले जाणार होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, फोनला आग लागल्यानंतर त्या बॅटरी फुटल्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता.

( नक्की वाचा : Kurnool Bus Fire: बंद दार, पडदे आणि.. धावत्या बसमध्ये 19 जणांचा कोळसा ! वाचलेल्या प्रवाशांचा थरारक अनुभव )
 

इंधन गळती आणि बाईक अडकल्याने आगीला सुरुवात

आंध्र प्रदेश अग्निशमन विभागाचे (Andhra Pradesh Fire Services Department) महासंचालक पी. व्यंकटरमण यांनी आगीच्या मूळ कारणांवर स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या माहितीनुसार, आगीला सुरुवात बसच्या पुढील भागात इंधन गळतीमुळे (Fuel Leakage) झाली असावी. बसखाली एक दुचाकी (Bike) अडकली, त्यामुळे पेट्रोल बाहेर सांडले. उष्णता किंवा ठिणगीच्या संपर्कात येताच या पेट्रोलने पेट घेतला. व्यंकटरमण यांनी सांगितले की, स्मार्टफोनच्या स्फोटाव्यतिरिक्त, बसमधील वातानुकूलन यंत्रणेसाठी (AC System) वापरलेल्या इलेक्ट्रिकल बॅटरीचाही स्फोट झाला, ज्यामुळे आगीचा फैलाव अधिक वेगाने झाला.

बसच्या रचनेतही त्रुटी, निष्काळजीपणामुळे वाढली दुर्घटना

"आम्ही वितळलेल्या पत्र्यातून हाडे आणि राख खाली पडताना पाहिले," असं व्यंकटरमण यांनी यावेळी सांगितलं. व्यंकटरमण यांच्या या माहितीवरुन आगीची तीव्रता आणखी स्पष्ट झाली आहे. 

दरम्यान, महासंचालकांनी बसच्या संरचनेत (Structural Flaw) एक मोठी त्रुटी असल्याचेही निदर्शनास आणले. बसचे वजन कमी करून वेग वाढवण्यासाठी लोखंडाऐवजी हलक्या अॅल्युमिनियमचा (Lightweight Aluminium) वापर करण्यात आला होता. अपघाताच्या वेळी, याच अ‍ॅल्युमिनियममुळे बसचे पत्रे लवकर वितळले आणि आगीची तीव्रता अधिक वाढून अपघाताची भीषणता अधिकच वाढली, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com