Army Chief: देशाच्या नव्या लष्करप्रमुखांचं थेट पुणे कनेक्शन! वाचा कोण आहेत नवे सेनाप्रमुख धीरज सेठ

Indian Army New Chief: देशाचे पुढील लष्करप्रमुख म्हणून लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Indian Army New Chief:  नवे लष्करप्रमुख धीरज सेठ यांचं पुण्याशी खास कनेक्शन आहे.
मुंबई:

Indian Army New Chief:  भारतीय लष्कराच्या सर्वोच्च पदाबाबत केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. देशाचे पुढील लष्करप्रमुख म्हणून लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ते सध्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याकडून भारतीय लष्कराची धुरा आपल्या हाती घेतील. 

जनरल या स्थायी रँकसह ते 30 जून रोजी आपला पदभार स्वीकारणार आहेत. पुढील लष्करप्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असणार आहे. देशाच्या सुरक्षेची अत्यंत महत्त्वाची धुरा सांभाळणारे धीरज सेठ नक्की कोण आहेत आणि त्यांचा लष्करातील प्रवास कसा राहिला आहे, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

Advertisement

पु्ण्याशी खास कनेक्शन

लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ यांचा महाराष्ट्राशी आणि विशेषतः पुणे जिल्ह्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील नामांकित राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीए मधून आपले लष्करी शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 1986 मध्ये ते भारतीय लष्कराच्या बख्तरबंद कोर म्हणजेच आर्मर्ड कोअरमध्ये कमिशन्ड झाले होते.

गेल्या जवळपास 4 दशकांच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी देशातील विविध भौगोलिक भूप्रदेशांमध्ये आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव मिळवला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या दहशतवादविरोधी मोहिमांचाही समावेश आहे.

( नक्की वाचा : Air Force Chief: ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची 4-5 F-16 विमाने पाडली, एअर चीफ यांचा मोठा खुलासा, म्हणाले... )

विविध आघाड्यांवर नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टिनेंट जनरल धीरज सेठ यांनी राजस्थानसारख्या वाळवंटी भागात आर्मर्ड रेजिमेंटचे नेतृत्व केले आहे. याशिवाय त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील अत्यंत संवेदनशील भागात दहशतवादविरोधी दलाचे कमांडर म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. 

लेफ्टिनेंट जनरल पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी सुदर्शन चक्र कोरची कमान हाती घेतली आणि त्यानंतर दिल्ली क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम पाहिले. दिल्लीत कार्यरत असताना त्यांनी अनेक प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लष्करी मोहिमांचे नेतृत्व केले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Operation Sindoor : पाकिस्ताने अखेर गुडघे टेकले! Nur Khan एअरबेसवरील भारतीय हल्ल्याची दिली कबुली )
 

दोन ऑपरेशनल कमांड सांभाळण्याचा दुर्मिळ मान

लष्करातील सर्वोच्च अशा सेना कमांडर पदावर बढती मिळाल्यानंतर त्यांनी दक्षिण पश्चिमी कमान आणि दक्षिणी कमान या दोन्ही महत्त्वाच्या विभागांचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले. भारताच्या पश्चिम सीमेवरील दोन अत्यंत महत्त्वाच्या ऑपरेशनल कमांडचे नेतृत्व करण्याचा दुर्मिळ बहुमान धीरज सेठ यांनी मिळवला आहे. 

याशिवाय त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये एका स्वतंत्र आर्मर्ड ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर म्हणून, अंगोला देशातील संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहिमेत ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून आणि लष्कर मुख्यालयात सहाय्यक लष्करी सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.

Advertisement

लष्कराच्या आधुनिकीकरणात महत्त्वाचे योगदान

लष्कराची क्षमता वाढवणे आणि त्याचे आधुनिकीकरण करणे यामध्ये धीरज सेठ यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांनी सामरिक नियोजन आणि क्षमता विकास संचालनालयात अनेक महत्त्वाच्या आणि धोरणात्मक पदांवर काम केले आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी लष्करातील सर्व अंतर्गत अभ्यासक्रमांमध्ये आणि प्रशिक्षणात नेहमीच अव्वल स्थान पटकावले आहे. 

त्यांनी ज्युनियर कमांड कोर्समध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला होता, तसेच डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी अधिकारी म्हणून पदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी हायर कमांड कोर्स आणि प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स कॉलेजमधूनही उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतले असून पॅरिसमधील कमांड अँड स्टाफ कोर्समध्येही त्यांनी भाग घेतला आहे.