Operation Sindoor: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची झोप उडाली होती, ही बाब आता खुद्द पाकिस्ताननेच मान्य केली आहे. मे 2025 मध्ये झालेल्या या संघर्षाच्या आठ महिन्यांनंतर पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी भारताच्या एअरस्ट्राईकमुळे झालेल्या नुकसानाची कबुली दिली आहे. भारताने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे रावळपिंडीतील प्रमुख एअरबेसचे मोठे नुकसान झाले होते.
ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानला मोठा तडाखा
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एका पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची कबुली दिली. भारताने या ऑपरेशन अंतर्गत रावळपिंडीतील चकलाल भागातील नूर खान एअरबेसवर जोरदार हल्ला चढवला होता. दार यांच्या म्हणण्यानुसार, भारताने अवघ्या 36 तासांच्या कालावधीत किमान 80 ड्रोन पाकिस्तानच्या दिशेने पाठवले होते. जरी त्यांनी 79 ड्रोन पाडल्याचा दावा केला असला, तरी एका ड्रोनने नूर खान एअरबेसचे प्रचंड नुकसान केले आणि तेथे अनेक कर्मचारी जखमी झाले.
( नक्की वाचा : भारताशी कनेक्शन असलेल्या उद्योगपतीने खरेदी केली पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स, वाचा कोण आहेत आरिफ हबीब? )
भारताने का केली होती ही कारवाई?
भारताने 7 मे 2025 रोजी पहाटेच्या सुमारास ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 26 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी 26 निष्पाप नागरिकांची हत्या केली होती.
या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने ही मोहीम राबवली होती. या हल्ल्याने पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य करून भारताने आपली सामरिक ताकद जगाला दाखवून दिली होती.
पाकिस्तानच्या भूमिकेत अचानक बदल
सुरुवातीला या हल्ल्यात फारसे नुकसान झाले नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानने आता आपली भूमिका बदलली आहे. इशाक दार यांनी सांगितले की, 10 मे रोजी पहाटे भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला करण्याची चूक केली आणि त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले. मात्र, या विधानामुळे भारताच्या स्ट्राइकचा पाकिस्तानवर किती खोलवर परिणाम झाला होता, हे स्पष्ट झाले आहे.
सॅटेलाईट फोटोंमधूनही नूर खान एअरबेसवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे भारताच्या हल्ल्याची तीव्रता सिद्ध होते.
( नक्की वाचा : Air Force Chief: ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची 4-5 F-16 विमाने पाडली, एअर चीफ यांचा मोठा खुलासा, म्हणाले... )
आंतरराष्ट्रीय मध्यस्थी आणि युद्धबंदीचा घटनाक्रम
इशाक दार यांनी या संघर्षाच्या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय हालचालींवरही प्रकाश टाकला. त्यांच्या दाव्यानुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी 10 मे रोजी सकाळी 8.17 वाजता त्यांना फोन केला होता. रुबिओ यांनी भारत युद्धबंदीसाठी तयार असल्याचे सांगितले आणि पाकिस्तानची संमती विचारली. त्यानंतर सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि अखेर युद्धबंदीवर शिक्कामोर्तब झाले.
पाकिस्तानने यावेळी भारताची 7 विमाने पाडल्याचा दावा केला असला, तरी त्याचा कोणताही पुरावा त्यांनी सादर केलेला नाही.
राष्ट्राध्यक्षांचा बंकरमध्ये जाण्यास नकार
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनीही या युद्धाच्या काळातील एक आठवण सांगितली. भारताचे हल्ले सुरू असताना त्यांच्या लष्करी सचिवाने त्यांना सुरक्षेसाठी बंकरमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता.
मात्र, झरदारी यांनी तो सल्ला धुडकावून लावला. नेते बंकरमध्ये मरत नाहीत तर रणांगणावर मरतात, असे उत्तर त्यांनी दिल्याचे एका सभेत सांगितले. यावरून भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांमध्ये किती घबराट पसरली होती, हे दिसून येते.
ब्राह्मोस आणि राफेलची ताकद
नूर खान एअरबेस हा इस्लामाबादपासून 25 किमी पेक्षा कमी अंतरावर असलेला एक अत्यंत महत्त्वाचा लष्करी तळ आहे. भारताने या तळावर हल्ला करण्यासाठी नेमकी कोणती क्षेपणास्त्रे वापरली हे अधिकृतपणे सांगितले नसले तरी, तज्ज्ञांच्या मते ब्राह्मोस किंवा स्कॅल्प (SCALP) या क्षेपणास्त्रांचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.
भारतीय हवाई दलाच्या सु-30 फायटर विमानांमधून ब्राह्मोस आणि राफेल विमानांमधून स्कॅल्प क्षेपणास्त्रे डागून पाकिस्तानच्या या महत्त्वाच्या तळाला लक्ष्य करण्यात आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world