'रॉबर्ट वाड्रा अबकी बार...' अमेठीतील 'ती' पोस्टर्स हटवली

Loksabha Elections Amethi गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीमधून काँग्रेसनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
रॉबर्ट वाड्रा यांची पोस्टर्स अमेठीतून हटवण्यात आली आहेत.
अमेठी:

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections 2024) प्रचार आता रंगात आलाय. पहिल्या टप्प्याचं मतदान संपलंय. त्यानंतरही गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीमधून काँग्रेसनं अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) इथून पुन्हा निवडणूक लढवणार असा काही जणांचा दावा आहे. तर काही जण प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) उमेदवार असतील असं सांगत आहेत. या सर्व चर्चा सुरु असतानाच अमेठीमध्ये रॉबर्ट वाड्रा यांना पाठिंबा देणारे पोस्टर लावण्यात आल्यानं खळबळ उडाली होती.

हे पोस्टर देशभर व्हायरल झाल्यानंतर अखेर हटवण्यात आले आहेत.  हे पोस्टर कुणी लावले याबाबत माहिती नाही. या पोस्टरच्या खाली निवदेक म्हणून अमेठीचे नागरिक असं लिहलं आहे. 'अमेठी की जनता करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अबकी बार' असं या पोस्टरवर लिहण्यात आलंय. या पोस्टरबाजीनंतर अमेठीतून काँग्रेस रॉबर्ट वाड्रा यांना मैदानात उतरवणार असा अंदाज बांधला जात आहे.

विशेष म्हणजे, रॉबर्ट वाड्रा यांनी देखील अमेठीतून निवडणूक लढवण्याची इच्छा यापूर्वी व्यक्त केल्यानं या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.

अमेठीतून काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्यास विलंब होतोय. त्यावर केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या विद्यामान भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी टोला लगावला होता. राहुल गांधी यांनी 15 वर्ष खासदार म्हणून जितकं काम केलं होतं, त्यापेक्षा जास्त काम मी 5 वर्षांमध्ये केलं, असा दावा इराणी यांनी केला होता.

( नक्की वाचा : अमेठीच्या प्रश्नावर राहुल गांधींनी सोडलं मौन, निवडणूक लढवण्यावर दिलं उत्तर )
 

अमेठीतील सभेत बोलताना स्मृती इराणी यांनी सांगितलं की, 'जीजाजींचं लक्ष या जागेवर आहे. मेहुणे (राहुल गांधी) काय करतील? एक काळ होता ज्यावेळी बसमधून प्रवास करणारे लोक आपलं सीट नक्की करण्यासाठी त्यावर रुमाल ठेवत होते. राहुल गांधी रुमाल टाकण्यासाठी येतील, कारण त्यांचे जीजाजींचे लक्ष या जागेवर आहे.'

Advertisement

अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण, 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला. अमेठीमध्ये पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. 

Topics mentioned in this article