Crime News: उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्लीत राहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीला लखनऊमध्ये बंधक बनवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही क्रूरता कोणा अनोळखी व्यक्तीने नाही, तर तरुणीच्याच एका चार वर्षांपूर्वीच्या ओळखीच्या व्यक्तीने आपल्या मित्रांच्या मदतीने केली आहे. नराधमांनी पीडितेला तीन दिवस एका खोलीत कोंडून ठेवले आणि अमली पदार्थमिश्रित कॉफी पाजून आळीपाळीने तिचे शारीरिक शोषण केले.
प्रवास करताना परिचित तरुणाने गाठले
पीडित तरुणी दिल्लीतील एका नामांकित महाविद्यालयातून बीए ऑनर्स करत असून सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत आहे. महाविद्यालयाच्या सुट्ट्यांमध्ये ती जौनपूर येथील आपल्या घरी आली होती. 15 मे रोजी तिचे हॉल तिकीट येणार होते, ज्यासाठी ती सुहेलदेव एक्सप्रेसने दिल्लीला परतत होती. ट्रेन सुरू झाल्यानंतर तिने जौनपूर येथीलच परिचित असलेल्या शिवम यादव याला व्हॉट्सॲपवर मेसेज केला. ट्रेन लखनऊच्या चारबाग स्टेशनवर पोहोचताच शिवम त्याचा मित्र शनी यादव याला घेऊन तिथे पोहोचला.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
कॉफीमध्ये दिली गुंगीची औषधे
दोघांनी आग्रह करून तरुणीला ट्रेनमधून उतरवले आणि सुशांत गोल्फ सिटी परिसरातील एका खोलीत नेले. खोलीवर पोहोचल्यानंतर शनी जेवण आणण्यासाठी गेला. जेवण झाल्यानंतर शिवमने तरुणीला कॉफी प्यायला दिली. आरोप आहे की, या कॉफीमध्ये आधीच झोपेच्या गोळ्या मिसळण्यात आल्या होत्या. कॉफी पिताच तरुणीला तीव्र गुंगी आली आणि ती बेशुद्ध पडू लागली. याचा फायदा घेऊन शिवमने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तरुणीने विरोध करूनही आरोपीने रात्रभर तिच्यावर अत्याचार केले.
तीन दिवस तिघांकडून आळीपाळीने अत्याचार
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 मे रोजी शिवम खोलीबाहेर गेला आणि त्याचा मित्र शनी यादव तिथे आला. शनीनेही घाबरलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अनेकवेळा बलात्कार केला. आरोपी जेव्हा जेव्हा बाहेर जात असत, तेव्हा खोलीचा दरवाजा बाहेरून लॉक करून जात. नराधमपणाची हद्द तेव्हा झाली जेव्हा 17 मे रोजी या गुन्ह्यात तिसरा मुलगाही सामील झाला, ज्याला पीडिता ओळखतही नव्हती. तिघांनी मिळून 18 मेच्या दुपारपर्यंत तरुणीला बंधक ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला
पुन्हा ट्रेनमध्ये बसवून पळ काढला
सलग तीन दिवस शोषण केल्यानंतर, 18 मे रोजी संध्याकाळी आरोपींनी चारबाग स्टेशनसाठी कॅब बुक केली. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने त्याच सुहेलदेव एक्सप्रेसच्या स्लीपर कोचमध्ये बसवून दिल्लीसाठी रवाना केले. ट्रेन जेव्हा बरेली स्टेशनजवळ पोहोचली, तेव्हा पीडित तरुणीने हिंमत दाखवून रडत रडत फोनवरून वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
(नक्की वाचा- Fuel Price Hike Today: इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ; चेक करा नवीन दर)
वडिलांची एनकाउंटरची मागणी
मुलीची आपबीती ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर संपर्क साधून मदत मागितली. माहिती मिळताच जीआरपी (GRP) चे पथक ट्रेनमध्ये तरुणीजवळ पोहोचले आणि तिला धीर दिला. यानंतर तरुणीला दिल्लीच्या आनंद विहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत 'झिरो एफआयआर' (Zero FIR) नोंदवण्यात आली.
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे आणि आयएएस (IAS) बनण्याचे तिचे स्वप्न आहे. मात्र, या घटनेनंतर तिची मानसिक स्थिती खालावली असून ती तीव्र धक्क्यात आहे. तिने लोकांशी बोलणे पूर्णपणे बंद केले आहे. संतप्त वडिलांनी न्यायाची मागणी करत, "आम्हाला फक्त न्याय हवा आहे, या नराधमांचे एनकाउंटर झाले पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.