सौरभ नाईक, प्रतिनिधी
देशातील अनेक भागात आजही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. उन्हाळ्यात तर हा प्रश्न आणखी गंभीर होतो. घरात पाणी नसल्यानं मुलांची लग्न होत नाहीत. पाण्याची टंचाई असलेल्या गावात मुली देण्यास पालक तयार नसतात. मुलींची देखील त्या गावातील मुलांशी लग्न करण्याची इच्छा नसते, या सर्व गोष्टी यापूर्वी अनेकदा उजेडात आल्या आहेत. नुकत्याच उघड झालेल्या एका प्रकरणात घरातील पाणी टंचाईला कंटाळून विवाहित महिला थेट माहेरी निघून गेली. त्यानंतर नवऱ्यानं थेट जिल्हाधिकाऱ्यांकडं धाव घेतली. या तक्रारीनंतर सर्व प्रशासन 'भगीरथ' बनलं. त्यांनी त्या गावाची मोठी समस्या दूर गेली. विवाहित महिला माहेरी गेल्यानं गावाला सुखाचे दिवस कसे आले? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील आदिवासीबहुल दिंडोरी जिल्ह्यातील देवरा गावात पाणीटंचाई पाचवीला पुजलेली. दोन-अडीच हजारांच्या लोकवस्तीसाठी अवघा एक हातपंप. त्यामुळे साहजिकच येथे सकाळपासून ते रात्रीपर्यंत पाण्यासाठी झुंबड उडालेली असते. इतके करूनही प्रत्येकाला मोठ्या मुश्किलीने पाणी मिळते. दररोजच्या याच त्रासाला कंटाळून या गावातील जितेंद्र सोनी यांची पत्नी लक्ष्मी मुलांना सोबत घेऊन घर सोडून माहेरी निघून गेली.
जितेंद्र यांनी तिची खूप मनधरणी केली, मात्र ती अजिबातच बधली नाही. त्यांनी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होईल, असे सांगूनही ती ठाम राहिली. ‘जिथे पाणीच नाही, तिथे माझ्या मुलांचे भवितव्य चांगले होऊच शकत नाही,' असे सांगून नवऱ्याची विनंती त्याने धुडकावून लावली. त्यामुळे हतबल झालेले जितेंद्र अखेर मंगळवारी जिल्हा प्रशानाच्या साप्ताहिक जनसुनावणी कार्यक्रमात धडकले आणि त्यांनी त्यांची फिर्याद अधिकाऱ्यांसमोर मांडली. दिंडोरीचे जिल्हाधिकारी यांनी तातडीने सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाला गावाची पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले.
( नक्की वाचा : Home Loan : होम लोनचा EMI झाला कमी! 20, 30 आणि 50 लाख रुपयांच्या कर्जावर किती होणार बचत? )
जुन्या जलवाहिनीला गावातील टाकीशी जोडण्याचे काम आता सुरू झाले आहे. या टाकीतून सध्याच्या जलवाहिनीला जोडणी दिली की, सोनी आणि देवराच्या अन्य गावकऱ्यांना पाणी मिळणार आहे.
घरात शौचालयाची सुविधा नसल्याने सासरचे घर सोडून जाणारी महिला आणि तिच्या नवऱ्याने त्यासाठी सर्वांच्या विरोधात जाऊन दिलेला लढा ‘टॉयलेट–एक प्रेमकथा' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला होता. याच चित्रपटाची आठवण व्हावी, अशी ही घटना. बायकोच्या रुसव्याने का होईना, आता संपूर्ण गावाला पाणी मिळणार आहे