प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी असा जवळपास दीड महिने हा धार्मिक सोहळा सुरु राहणार आहे. जगभरातून लाखो भाविक प्रयागराज येथे पोहोचत आहेत. ISRO ने महाकुंभाचे काही फोटो अंतराळातून काढले आहेत.
हैदराबादच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने (NRSC) कुंभमेळ्याचे हे फोटो काढले आहेत. महाकुंभाचे फोटो काढण्यासाठी भारताचे आधुनिक ऑप्टिकल उपग्रह आणि डे-नाईट व्हिजन रडारसॅटचा वापर केला. या फोटोंमधून, तात्पुरती टेंट सिटी आणि नदीवर बांधलेले पूल पाहता येत आहेत.
रडारसॅटचा वापर करुन ढगांमधूनही फोटो काढता येऊ शकतात. प्रयागराजमध्ये ढगाळ वातावरण होते. EOS-04 (RISAT-1A) 'C' बँड मायक्रोवेव्ह उपग्रहाने 15 सप्टेंबर 2023 आणि 29 डिसेंबर 2024 रोजी हे फोटो घेतले आहेत. या उपग्रहामध्ये कोणत्याही हवामानात फोटो घेण्याची क्षमता आहे. नवीन पॅगोडा पार्कचे बांधकामही अवकाशातून पाहता येते.
कुंभमेळ्यातील आपत्ती आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी उत्तर प्रदेश प्रशासन या फोटोंचा वापर करत आहे. फोटोंमध्ये प्रयागराज परेड ग्राउंड दिसत आहे. पहिला फोटो 6 एप्रिल 2024 चा आहे, जेव्हा महाकुंभ सुरू झाला नव्हता. दुसरा फोटो 22 डिसेंबर 2024 मधला आहे, जेव्हा बांधकाम सुरु झाले होते. तिसरा फोटो 10 जानेवारी 2025 चा आहे, जेव्हा भाविकांची गर्दी कुंभमेळ्यात होऊ लागली. 6 एप्रिल 2024 मधला फोटोमध्ये मैदान रिकामे दिसत आहे.
नवीन शिवालय उद्यानाची निर्मिती अवकाशातून पाहिली जाऊ शकते. 6 एप्रिल 2024 ते 10 जानेवारी 2025 पर्यंत शिवालय उद्यानाच्या बांधकामाची प्रगती दिसून येते. भारताच्या नकाशाच्या आकारात बनवलेले पार्क देखील अतिशय सुंदर दिसत आहे. यावर्षी, महाकुंभमेळ्यात राहण्यासाठी सुमारे 1,50,000 तंबू, 3 हजार स्वयंपाकघरे, 1.45 लाख स्वच्छतागृहे आणि 99 पार्किंग लॉट्सने सुसज्ज आहेत.