Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करण्यापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 लोकांचा मृत्यू झाला तर 60 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं तेथील नियम अधिक कठोर केले आहेत. योगी सरकारच्या आदेशानंतर स्थानिक प्रशासनानं महाकुंभमधील व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. तुम्ही देखील महाकुंभासाठी प्रयागराजला जाणार असाल तर तुम्हाला हे नियम पाळावे लागतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नो व्हेईकल झोन : या घटनेनंतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महाकुंभासाठी आलेले सर्व वाहनं बाहेर थांबवण्यात येणार आहेत.
VVIP पास रद्द : महाकुंभ परिसरात कोणत्याही स्पेशल वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. नवे नियम लागू झाल्यानंतर कोणतेही व्हीव्हीआयपी वाहनं कुंभ परिसरात थेट पोहचणार नाहीत. इथं येणाऱ्या भाविकांच्या खाणे-पिण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
वन-वे मार्ग सुरु : गर्दी नियंत्रण करण्यासाठी वन-वे मार्ग आजपासून सुरु करण्यात आला आहे. भाविकांची वाहतूक सुरळीक करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
जवळच्या जिल्ह्यातील वाहनांना बंदी : प्रयागराजला लागून असलेल्या जिल्ह्यातील वाहनांना जिल्ह्याच्या सीमांवरच रोखलं जात आहे. या वाहनांमुळे प्रयागराज शहरात विशेषत: महाकुंभच्या परिसरात मोठी गर्दी होते. त्याचबरोबर सर्व प्रवासी वाहनांनाही बंदी घालण्यात आली आहे.
चार फेब्रुवारीपर्यंत शहरात येणाऱ्या चार चाकी वाहनांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. 4 फेब्रुवारीपर्यंत मात्र कठोर निर्बंध असतील.
( नक्की वाचा : Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात कधी होणार शाही स्नान? वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्व )
नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती : महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर वरिष्ठ IAS अधिकारी आशिष गोयल यांच्यावर पुढील व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते 2019 साली प्रयागराजचे आयुक्त होते. सध्या सारा पॉवर कॉर्पोरेशनचे संचालक आहेत. बुधवारी (29 जानेवारी) रात्री योगी आदित्यनाथ यांच्या घरी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे 2019 मधील प्रयागराजचे जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना मेळ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर महाकुंभासाठी 5 विशेष सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रयागराजमधील सर्व स्टेशनवर जमा होणाऱ्या गर्दीचेही नियंत्रण केले जाणार आहे.