Former PM Manmohan Singh passed away : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. 26 सप्टेंबर 1932 रोजी पश्चिम पंजाबमधील (आत्ताचे पाकिस्तान) मनमोहन सिंग यांचा जन्म झाला. नोकरशहा, अर्थतज्ज्ञ तसंच राजकारणी म्हणून त्यांचं योगदान सर्वांच्या लक्षात राहणारं आहे. 2004 ते 2014 या कालावधीमध्ये ते देशाचे पंतप्रधान होते.
देशाचे पहिले शीख पंतप्रधान
मनमोहन सिंग हे देशाचे पहिले शिख पंतप्रधान होते. सध्या पाकिस्ताममधील पंजाब प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला. 1947 साली देशाची फाळणी झाली. त्यावेळी लाखो हिंदू आणि शीख नागरिकांना पाकिस्तानमधून निर्वासित व्हावं लागलं. त्यामध्ये मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. देशाच्या फाळणीनंतर ते भारतामध्ये आले.
( नक्की वाचा : भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देणारे महर्षी हरपले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन )
सुरुवातीचं आयुष्य आणि शिक्षण
मनमोहन सिंग लहान असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर आजी-आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. आजी-आजोबांच्या घरीचं त्यांचं शिक्षण झालं. मनमोहन सिंग यांचं सुरुवातीचं शिक्षण उर्दूमध्ये झालं. पंतप्रधान असताना अनेकदा ते त्यांच्या भाषणाची स्क्रीप्ट उर्दू तसंच गुरुमुखीमध्ये लिहीत असतं.
मनमोहन सिंह यांनी अमृतसरमधील हिंदू कॉलेजमधून शिक्षण घेतलं. होशियारपूरच्या पंजाब विद्यापीठातून 1952 साली त्यांनी अर्थशास्त्रातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. 1954 साली त्यांचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालं. 1957 साली त्यांनी केंब्रीज विद्यापीठातून अर्थशास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं.
मनमोहन सिंग यांनी 1962 साली ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं. डॉ. सिंह यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापनाचं कार्य केलं. 1971 साली केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1972 मध्ये लवकरच अर्थमंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांना बढती देण्यात आली.
यूनायटेड नेशन्समध्ये काही काळ काम केल्यानंतर ते पुन्हा भारतामध्ये परतले. त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. केंद्रीय अर्थमंत्रालयातील सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार तसंच युजीसीचे अध्यक्ष या पदांवरही त्यांनी काम केलं आहे.
अर्थमंत्री म्हणून कार्य
मनमोहन सिंह केंद्रीय अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कामाची खऱ्या अर्थानं जगाला ओळख झाली. नरसिंहा राव असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यापैकी पहिल्या अर्थसंकल्पात त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची कवाडं जगासाठी खुली केली. आज परदेशी गुंतवणूक हा आजचा परावलीचा शब्द बनलाय. त्याचे प्रणेत डॉ. मनमोहन सिंह होते. 90च्या दशकाच्या सुरुवातीला उद्योग आणि व्यापाराचं धोरण बदलून देशभरच्या अर्थव्यवस्थेला कृषी प्रधान अर्थव्यवस्थेकडून उद्योग प्रधान किंवा सेवा प्रधान अर्थव्यवस्था बनवण्यात मनमोहन सिंहांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा होता.
देशावरील आर्थिक संकट टाळण्यासाठी त्यांनी केलेले उपाय प्रभावी ठरले. जगभरातील अर्थतज्ज्ञांची त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर 1998 ते 2004 या कालावधीत ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं.
पंतप्रधान मनमोहन सिंग
2004 साली काँग्रेस नेतृत्त्वाखालील यूपीए सरकार सत्तेवर आलं. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शेवटच्या क्षणी पंतप्रधान होण्यास नकार दिला. त्यानंतर मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, आधार कार्डची अंमलबजावणी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले.
2008 साली अमेरिकेसोबत करण्यात आलेला अणूकराराला मूर्त रुप देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. हा करार होऊ नये म्हणून डाव्या पक्षांनी पूर्ण प्रयत्न केले. त्यावेळी यूपीए सरकार डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून होतं. पण, मनमोहन सिंग यांनी त्यांचा विरोध धुडकावून लावून अणूकरा पुढं नेला. त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला झाला. 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा काँग्रेसल फायदा झाला. काँग्रेस आणि युपीएचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं. पंडित नेहरु यांच्यानंतर पंतप्रधान पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेवर आलेले ते पहिले पंतप्रधान ठरले.