Former PM Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं गुरुवारी (26 डिसेंबर) रोजी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. नवी दिल्लीतल्या AIIMS हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रात्री उशीरा आला फोन
प्राध्यापक, सनदी नोकरशाह ते राजकारणी असा डॉ. मनमोहन सिंग यांचा प्रवास होता. त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यांना रात्री उशीरा आलेल्या एका फोन कॉलमुळे त्यांचं सारं आयुष्यच बदलून गेलं. देशाच्या इतिहासालाही कलाटणी मिळाली.
जून 1991 मध्ये रात्री मनमोहन सिंग यांना तो फोन आला होता. त्या रात्री मनमोहन सिंग नेदरलँडमधील एका परिषदेत सहभागी होऊन दिल्लीत परतले होते. ते रात्री आराम करत असताना त्यांना हा फोन आला. मनमोहन सिंग यांचे जावाई विजय तन्खा यांनी तो फोन उचलला. पीव्ही नरसिंह राव यांचे विश्वासू पीसी अॅलेक्झँडर यांनी तो फोन केला होता. त्यांनी विजय यांना त्यांच्या सासऱ्यांना उठवावं अशी विनंती केली.
( नक्की वाचा : Manmohan Singh: पाकिस्तानमधून निर्वासित, नोकरशहा आणि पंतप्रधान... असं होतं मनमोहन सिंग यांचं आयुष्य )
कसे झाले अर्थमंत्री?
त्या फोननंतर काही तासांमध्येच मनमोहन सिंग आणि पीसी अॅलेक्झँडर यांची भेट झाली. त्यांनी डॉ. सिंह यांना केंद्रीय अर्थमंत्री करण्याची पीव्ही नरसिंहराव यांची योजना असल्याचं सांगितलं. मनमोहन सिंग त्यावेळी युजीसीचे अध्यक्ष होते. त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. देशाच्या अर्थव्यवस्थेतील तो सर्वात नाजूक कालखंड होता. त्या कालखंडात नरसिंह राव यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला.
मनमोहन सिंग यांच्या हवाल्यानं त्यांची मुलगी दमन सिंग यांनी 'स्ट्रिक्टली पर्सनल, मनमोहन अँड गुरशरण' या पुस्तकात 21 जून 1991 या दिवसाची आठवण सांगितली आहे. त्यावेळी मनमोहन सिंग यूजीसी ऑफिसमध्ये हसले होते. त्यांना शपथविधी कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं. त्या पुस्तकात माजी पंतप्रधानांच्या हवाल्यानं लिहलं आहे की, शपथ घेण्यासाठी त्यांना रांगेत पाहताच अनेक नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मंत्रिमंडळाचं खातेवाटप नंतर जाहीर झालं. पण, नरसिंह राव यांनी त्यांना अर्थखातं देणार असल्याची कल्पना दिली होती.
( नक्की वाचा : Dr.Manmohan Singh : मनमोहन सिंगांच्या एकाच फटक्यात मोहम्मद अली जिन्ना गरगरले; वाचा भन्नाट किस्सा )
आर्थिक सुधारणांचे शिल्पकार
केंद्रीय अर्थमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलली. त्यांच्या कार्यकाळात जगानं वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला. पीव्ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या जोडीनं देशात आर्थिक सुधारणांना गती दिली. त्यांच्यावर काँग्रेस अंतर्गत तसंच बाहेरुनही मोठी टीका झाली. पण, त्यांनी या सुधारणा पुढे रेटल्या. त्यामुळेच देशात आर्थिक सुधारणांचं युग सुरु झालं.