Marriage Scam: वऱ्हाड आलं, नवरदेव नटले पण नवरीच बेपत्ता! एकाच वेळी 42 घरांमध्ये सनईऐवजी पसरली शांतता

Marriage Scam: लग्नाचं स्वप्न दाखवून चक्क 42 कुटुंबांची फसवणूक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Marriage Scam: या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून पैसे उकळण्यात आले.
मुंबई:

Marriage Scam: लग्न ठरेल, घरी सून येईल आणि आनंदाचे सनई-चौघडे वाजतील, अशा मोठ्या आशेने अनेक कुटुंबं विवाहस्थळी जमा झाली होती. नवरदेव नटून-थटून तयार होते, वऱ्हाडी मंडळींच्या चेहऱ्यावर उत्साह होता, पण ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते, तो क्षण कधी आलाच नाही. कारण ज्यांच्याशी लग्न होणार होतं, त्या नवरी मुली तिथे पोहोचल्याच नाहीत. लग्नाचं स्वप्न दाखवून चक्क 42 कुटुंबांची फसवणूक झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील देवासमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. ज्या तरुणांची लग्नं ठरण्यास अडचणी येत होत्या, अशा कुटुंबांना आरोपींनी आपलं लक्ष्य केलं. इंदूरमधील एका अनाथालयातील मुलींशी लग्न लावून देतो, असं आमिष या कुटुंबांना दाखवण्यात आलं होतं. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेले मॉडेल्स आणि इतर मुलींचे फोटो या कुटुंबांना दाखवले. हे फोटो पाहून अनेकजण या जाळ्यात अडकले आणि लग्नासाठी तयार झाले.

Advertisement

( नक्की वाचा : Titwala News: टिटवाळ्यात 600 कोटींचा 'चाळ झोल';हातोडा पडला, तरी इमारत उभी! वाचा धक्कादायक सत्य )

लाखोंचा गंडा आणि फसवणुकीचा बनाव

या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून पैसे उकळण्यात आले. काही कुटुंबांकडून 12,000 ते 20,000 रुपये, तर काहींनी 25,000 रुपये दिल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे 42 कुटुंबांकडून एकूण 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली होती. 24 मे रोजी देवासमधील राधागंज येथील क्लब ग्राउंडवर सर्वांना बोलावण्यात आले होते. 25 मे रोजी लग्न सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मंडप गायब आणि नवरीचा पत्ता नाही

ठरल्याप्रमाणे अनेक जिल्ह्यांमधून नवरदेव आणि त्यांचे नातेवाईक 24 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच मैदानावर पोहोचू लागले. मात्र, तिथे पोहोचल्यावर त्यांना मोठा धक्का बसला. तिथे लग्नाचा कोणताही मंडप नव्हता, जेवणाची सोय नव्हती की सोहळ्याची कोणतीही तयारी नव्हती. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा संयम सुटला, तेव्हा आयोजकांनी उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली. रात्री 10 वाजेपर्यंत नवरी मुली आल्याच नाहीत, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे या कुटुंबांच्या लक्षात आले.

( नक्की वाचा : NEET Paper Leak : नीट गैरप्रकारात पुण्यातील 5 प्राध्यापक CBI च्या रडारवर; कोचिंग सम्राटांचे कनेक्शन उघड )

पोलिसांकडून मुख्य आरोपींना अटक

या प्रकरणी पोलिसांनी मुकेश बैरागी आणि त्याची पत्नी सुनीता यांना अटक केली आहे. तपासात असे समोर आले आहे की, मुकेशचा भाऊ दिनेश दास बैरागी आणि सासरे नरसिंग दास बैरागी यांनीही या कटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुकेशने पोलिसांना सांगितले की, इंदूरमध्ये असलेला त्याचा भाऊ मुलींना घेऊन येणार होता, पण ऐनवेळी त्याने फोन बंद केला. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना केली आहेत.

Topics mentioned in this article