NEET Paper Leak : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून लातूर आणि पुण्यासारख्या शहरात येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यातील ज्या प्रसिद्ध कोचिंग संस्थांवर विश्वास ठेवून पालक आपली जमीन गहाण ठेवतात किंवा कर्ज काढतात, त्याच यंत्रणेतील काही घटक आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत. नीट (NEET-UG) परीक्षेतील गैरप्रकारांचा तपास आता केवळ पेपर फुटीपुरता मर्यादित न राहता, त्याने राज्यातील संपूर्ण कोचिंग अर्थव्यवस्थेचे धाबे दणाणले आहेत.
कोचिंग सम्राट आणि प्रशासकीय साखळीचा पर्दाफाश
या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती लातूरमधील सुप्रसिद्ध 'आरसीसी' (RCC) क्लासेसचे मालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर. तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर आता मनिषा मांढरे, मनिषा वाघमारे आणि पुण्यातील प्राचार्य मनिषा हवालदार यांची नावेही समोर आली आहेत.
मनिषा हवालदार या नीटच्या भौतिकशास्त्र (Physics) विषयाच्या भाषांतर प्रक्रियेशी अधिकृतपणे जोडल्या गेल्या होत्या. असा आरोप आहे की, स्मृतीवर आधारित प्रश्न तयार करून ते व्हॉट्सॲप आणि प्रिंटआउट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले. सीबीआय आता फॉरेन्सिक टूल्सच्या मदतीने डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करत असून या मोठ्या नेटवर्कचा शोध घेत आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंग डिलीट; पुरावे मिटवण्यासाठी मनिषा हवालदारने वापरली 'ही' शक्कल )
पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजचे प्राध्यापक रडारवर
तपासाचे धागेदोरे आता वैयक्तिक आरोपींकडून संस्थांकडे वळले आहेत. पुण्यातील एका अत्यंत प्रसिद्ध महाविद्यालयातील 5 प्राध्यापक सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. हे प्राध्यापक गेल्या अनेक वर्षांपासून आरोपींच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे आणि त्यातील काही जण तर एनटीए (NTA) च्या समित्यांवरही कार्यरत होते. कोचिंग संस्था, परीक्षेतील मध्यस्थ आणि संस्थात्मक संपर्क यांनी मिळून एक समांतर यंत्रणा उभी केली होती का, याचा तपास आता अत्यंत गांभीर्याने केला जात आहे.
लातूर पॅटर्न आणि बदललेले स्वरूप
एकेकाळी शिस्तप्रिय शिक्षणासाठी ओळखला जाणारा 'लातूर पॅटर्न' आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. एकेकाळी शैक्षणिक क्रांती मानल्या गेलेल्या या मॉडेलचे रूपांतर आता अशा संस्कृतीत झाले आहे, जिथे मार्कांनाच चलन मानले जाऊ लागले आहे. या स्पर्धेच्या युगात एका शेतकरी कन्येने नीट पेपर फुटीच्या बातम्यांमुळे हताश होऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटनाही समोर आली आहे. या गोंधळामुळे केवळ वैद्यकीयच नाही, तर अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशाचे वेळापत्रकही कोलमडले असून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
( नक्की वाचा : NEET Paper Leak : परीक्षेआधीच वाटला पेपर; लातूरचा प्राध्यापक PV कुलकर्णीने असा रचला होता पेपरफुटीचा प्लॅन )
पैशांचा महापूर आणि डिजिटल फसवणूक
तपासात असे समोर आले आहे की, टेलिग्राम (Telegram) सारख्या माध्यमांवरून '100 टक्के यश' आणि 'लीक पेपर' देण्याचे आश्वासन देऊन पालकांकडून लाखो रुपये उकळले जात होते. या व्यवहारांची व्याप्ती इतकी मोठी आहे की आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील यात प्रवेश केला आहे. आरोपींच्या मालमत्ता, कोचिंग व्यवसायातील गुंतवणूक आणि रोख व्यवहारांची तपासणी केली जात आहे. शिवराज मोटेगावकर यांच्या पुणे आणि लातूरमधील रिअल इस्टेट गुंतवणुकीचीही आता चौकशी सुरू झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आणि सुधारणांची मागणी
नीट परीक्षेतील या सावळागोंधळावर सर्वोच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे. मागील प्रकरणांमधून यंत्रणेने काही धडा घेतला आहे का, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. आता केवळ कारवाई करून थांबता येणार नाही, तर एनटीए (NTA) ची पुनर्रचना करणे, डिजिटल सुरक्षा वाढवणे आणि परीक्षा पद्धतीत मूलभूत सुधारणा करणे ही काळाची गरज बनली आहे. महाराष्ट्राची कोचिंग संस्कृती जी एकेकाळी यशाचे प्रतीक होती, ती आता या तपासामुळे मोठ्या संकटात सापडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world