Meghalaya News: खाण स्फोटात मजुराचा मृत्यू; अंत्यसंस्कारानंतर घरी परतल्याने एकच खळबळ

मेघालयातील खाण स्फोटात मृत घोषित करण्यात आलेला मजूर श्यामबाबू सिन्हा जिवंत घरी परतला आहे. यामुळे ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, तो नेमका कोणाचा होता? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मेघालयातील पूर्व जैंतिया हिल्समध्ये झालेल्या बेकायदेशीर 'रॅट-होल' खाण स्फोटात ज्या 31 मजुरांना मृत घोषित करण्यात आले होते, त्यांपैकी एक मजूर श्यामबाबू सिन्हा जिवंत घरी परतला आहे. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर काही दिवसांनी हा मजूर जिवंत परतल्याने खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय घडली होती घटना?

मेघालयातील म्यानसंगत गावातील थांगस्कू परिसरात एका बेकायदेशीर कोळसा खाणीत डायनामाईटच्या वापरामुळे भीषण स्फोट झाला होता. 9 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने शोध मोहीम थांबवली होती, कारण ढिगाऱ्याखाली कोणीही जिवंत वाचण्याची शक्यता उरली नव्हती. या दुर्घटनेत एकूण 31 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले होते, ज्यात श्यामबाबू सिन्हा यांचाही समावेश होता.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

ओळखीचा 'भयानक' घोळ

प्रशासनाने एका मृतदेहाची ओळख श्यामबाबू सिन्हा म्हणून पटवून तो मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. आसाममधील राताबारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या मूळ गावी या मृतदेहावर रीतसर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या तीन दिवसांनंतर श्यामबाबू अचानक गावात चालत आल्याने ग्रामस्थांची आणि कुटुंबीयांची पाचावर धारण बसली.

तपासाची व्याप्ती वाढली

श्यामबाबूंच्या परतण्याने आता अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाले, ती व्यक्ती कोण होती आणि तिची ओळख पटवण्यात चूक कशी झाली? मृतदेह ओळखण्याची प्रक्रिया केवळ घाईत उरकली गेली का?  या दुर्घटनेमागे बेकायदेशीर खाण माफियांचे जाळे, घातपाताची शक्यता आणि स्फोटकांच्या निष्काळजी हाताळणीचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासन या गोंधळाचा शोध घेत असून, श्यामबाबू सिन्हा जिवंत परतल्याने मृतांच्या ओळखीच्या प्रक्रियेवर आता नव्याने काम करावे लागणार आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article