मेटा कंपनीनं त्यांचे सीईओ मार्क झकरबर्गनं (Mark Zuckerberg) 2024 मधील सार्वत्रिक निवडणुकांबद्दल केलेल्या वक्तव्यावर भारत सरकारची माफी मागितली आहे. फेसबुक संस्थापक आणि मेटा कंपनीचे सीईओ झकरबर्गनं जो रेगन पॉडकास्टमध्ये एक दावा केला होता. त्यामध्ये कोव्हिड-19 नंतर भारतासह अनेक देशांमधील सरकार बदलले असं झकरबर्गनं म्हंटलं होतं. कोव्हिड-19 नंतर भारतासह जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये सत्तापरिवर्तन झाले. यामधून नागरिकांचा सरकारबद्दलचा कमी विश्वास स्पष्ट होतो, असं म्हंटलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते झकरबर्ग?
झकरबर्ग म्हणाले होते की, ,' 2024 हे जगभरात निवडणुकांचं वर्ष होतं. भारतासह सर्वच देशांमध्ये निवडणुका होत्या. जवळपास सर्वच सत्ताधारी निवडणुकीत पराभूत झाले. वर्षभरात कोणत्या ना कोणत्या वैश्विक घटना घडल्या. महागाईमुळे किंवा कोव्हिडचा सामना करण्यासाठी झालेल्या आर्थिक धोरणांमुळे किंवा सरकारनं कोव्हिडला ज्या पद्धतीनं हाताळले त्यामुळे असं वाटतं की याचा प्रभाव जागतिक होता.'
'मेटा' नं मागितली माफी
मेटा इंडियाचे उपाध्यक्ष (सार्वजनिक निती) शिवानंद ठुकराल यांनी झकरबर्ग यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. ठुकराल यांनी सांगितलं की, 'प्रिय माननीय मंत्री अश्विनी वैष्णव, 2024 मधील निवडणुकांमध्ये विद्यमान सरकारला मतदारांनी निवडलं नाही हे मार्क यांचं निरिक्षण अनेक देशांसाठी खरं आहे. पण, भारतासाठी नाही. आम्ही अनावधानानं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो. मेटा कंपनीसाठी भारत हा महत्त्वाचा देश आहे. आम्ही या देशातील नव्या भविष्याच्या केंद्रस्थानी असू अशी अपेक्षा करतो.'
( नक्की वाचा : 'या' गावात आजारी पडण्यावर प्रशासनाकडून बंदी, महापौरांवर निर्णय घेण्याची वेळ का आली? )
भारत सरकारनं घेतली होती गंभीर दखल
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी झकरबर्ग यांचं हे वक्तव्य निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. 'जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतामध्ये 2024 मध्ये 64 कोटींपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. भारतीय नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. झकरबर्गनं 2024 मधील निवडणुकांमध्ये भारतासह बहुतेक सरकारचा पराभव झाला असा दावा केला. जो तथ्यात्मक दृष्टीनं चूक आहे, असं वैष्णव यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर लिहिले होते.