राज्यात आणि देशात यावर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. देशभर बरसल्यानंतर आता मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तशी अनुकूल परिस्थिनी निर्माण झाली आहे. मॉन्सूनने सोमवारी पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागांतून माघार घेण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मात्र परतीच्या पाऊस अनेक भागांना झोडपून जाईल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सून यंदा उशीरा माघार घेत आहे. गेल्या वर्षी मान्सूनची माघार 25 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. मान्सूनचा हंगाम तांत्रिकदृष्ट्या 30 सप्टेंबर रोजी संपतो. मात्र ही माघार घेण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहते. IMD च्या अंदाजानुसार, मान्सूनचा हंगाम जून ते सप्टेंबर 'सामान्यपेक्षा जास्त' पावसाने संपेल.
(नक्की वाचा- दीड लाख पगार, विदेशात नोकरी; देशभरातून आलेल्या तरुणांची गर्दी पाहून पुणेकर अचंबित)
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली की, मान्सून पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून 23 सप्टेंबर, 2024 रोजी माघारला आहे. साधारणपणे मान्सून 17 सप्टेंबरला माघारी फिरण्यास सुरुवात होते. म्हणजे यंदा मान्सून 6 दिवस उशीरा माघारी फिरला आहे.
मान्सून माघारीची रेषा अनुपगढ, बिकानेर, जोधपूर, भुज आणि द्वारकामधून जाते. पुढे पश्चिम राजस्थानच्या आणखी काही भागांतून आणि पंजाब, हरियाणा आणि गुजरातच्या लगतच्या भागांतून मान्सूनच्या माघारीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असंही हवामान विभागने संगितलं आहे.
(नक्की वाचा - पहिल्या भरतीत दरमहा 2 लाख सॅलरी; भारतीयांसाठी इस्त्रायलची दुसरी देशव्यापी भरती पुण्यात होणार सुरू)
मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली या काळात म्हणजे 1 जून ते 23 सप्टेंबर या कालावधीत एकूण पाऊस सामान्य पेक्षा फक्त 5 टक्के जास्त होता. हंगामाच्या पहिल्या महिन्यात जूनमध्ये 11 टक्के कमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मान्सूनने जोरदार हजेरी लावली. साधारणपणे मान्सून संपूर्ण भारत 38 दिवसांत व्यापतो. यावर्षी जूनमध्ये संथ सुरुवात झाली तरी 34 दिवसांत देशभर परसला. यावर्षी सलग तिसऱ्यांदा मान्सूनने 2 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापला होता.