Panjabrao Dakh Weather Forecast : जून महिना येताच सर्वांचे डोळे आकाशाला लागतात. शेतकरी नांगरणीची तयारी करायला घेतो. शहरातील उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी मान्सूनची प्रतीक्षा असते. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर मान्सून वेगवान दक्षिण आणि पूर्व भारतातील मोठ्या भागात सक्रीय झाला. मात्र अचानक ब्रेक लागल्यासारखा मान्सून अडखळला. पुढील काही दिवस तरी मान्सूनची चिन्ह नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांमध्येही पेरणी करायची की नाही, याबाबत साशंकता आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे.
यंदा देशात दुष्काळाची भीती व्यक्त केली जात असताना पंजाबराव डख यांनी हा अंदाज फेटाळून लावला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नसून महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर येत्या काही दिवसात मुंबईसह राज्यभरात चांगला पाऊस पडेल. २० जूननंतर तापमान कमी होऊन पावसाला सुरूवात होऊ शकेल, असं डख यांनी सांगितलं.
पेरण्या कधी होणार?
दुष्काळ मनातून काढून टाका असं आश्वासन डख यांनी दिलं आहे. २१ जूननंतर टप्प्या टप्प्याने राज्यभरात पाऊस सक्रिय होईल. त्यानुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या पेरण्यात होतील. त्यानंतर उरलेल्या भागात १० ते १५ जुलैमध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील, असंही ते यावेळी म्हणाले.
यंदा पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असा मान्सूनचा प्रवास असेल. उत्तर महाराष्ट्रात २३ ते २४ जूननंतर चांगला पाऊस पडेल. जिथं सुरुवातीला पाऊस झाला नाही, तिथं १० ते १५ जुलैपर्यंत पावसाला सुरुवात होईल असंही पंजाबराव डख यांनी सांगितलं.
सर्वांची पेरणी एकत्र होणार नाही असं डख यांनी सांगितलं. २१ जून ते २ जुलैदरम्यान पेरण्या होतील. पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ लवकर पाऊस होईल. त्यामुळे पेरण्या लवकर होतील.
मुंबईत कधी येणार पाऊस?
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे-कोकण या पट्ट्यातही चांगला पाऊस होईल. मुंबईत पहिलाच पाऊस अतिवृष्टीसारखा होईल. दरवर्षी ७ जूनला पाऊस येतो. मात्र यंदा २२ दिवस पाऊस पुढे सरकला आहे. पुढील वर्षीही जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होतील. निसर्गाची हानी होत आहे, परिणामी तापमान वाढत आहे. यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने झाडं लावावी, असं आवाहन डख यांनी केलं आहे.