Apple Watch Save Life: अॅपल वॉचमुळे एका व्यक्तीचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. पुडुचेरीजवळ स्कूबा डायव्हिंग करत असताना, ॲपल वॉच अल्ट्रा मुळे एका 26 वर्षीय मुंबईतील तरुणाचे प्राण वाचले. ई-कॉमर्स कंपनीत काम करणारा क्षितिज झोडपे हा तरुण या उन्हाळ्यात डायव्हिंग करत होता. तेव्हा पाण्याखाली त्याच्या उपकरणांमध्ये बिघाड झाला आणि त्याचा जीव धोक्यात आला.
क्षितिज 2020 पासून डायव्हिंग करत आहे. बंगालच्या खाडीत तो सुमारे 36 मीटर खोलीवर गेला होता, तेव्हा अचानक त्याचा वजन पट्टा निघून गेला. वजन पट्टा निसटल्यामुळे क्षितिज वेगाने पाण्याच्या पृष्ठभागाकडे वर येऊ लागला. पाण्याखालील कोणत्याही व्यक्तीसाठी हा वेग घातक ठरू शकतो आणि यामुळे फुफ्फुसांना गंभीर इजा होऊ शकते.
क्षितिजने सांगितले की, तो सुमारे 36 मीटर खाली असताना अचानक वरच्या दिशेने झेपावू लागला, पण अनियंत्रित वेगामुळे त्याला स्वतःला थांबवता आले नाही. त्याचवेळी क्षितिजच्या मनगटावर बांधलेल्या ॲपल वॉच अल्ट्राने ही अचानक झालेली हालचाल त्वरित ओळखली. वॉचने त्वरित त्याच्या स्क्रीनवर वॉर्निंग दाखवायला सुरुवात केली, ज्यात त्याला हळू होण्याची सूचना दिली गेली.
जेव्हा क्षितिजने या वॉर्निंगकडे दुर्लक्ष केले, तेव्हा वॉचने त्याचा इमर्जन्सी सायरन वाजवणे सुरू केले. हा जोरदार सायरन, जो पाण्याच्या आतील आवाजापेक्षा वेगळा होता, त्यामुळे त्याच्या डायव्हिंग इन्स्ट्रक्टरला त्वरित सावध केले. सायरन ऐकताच इन्स्ट्रक्टर वेगाने क्षितिजच्या मदतीसाठी पोहोचला. तोपर्यंत क्षितिज सुमारे 10 मीटर वर आला होता. पण हरवलेल्या वजन पट्ट्यामुळे तो अजूनही वर ढकलला जात होता. ॲपल वॉच अल्ट्राच्या या इमर्जन्सी अलार्मने जीवघेणी ठरू शकणारी दुर्घटना टळली.
टीम कूक यांना पत्र आणि उत्तर
क्षितिजने मान्य केले की, त्याच्या घड्याळात असे फीचर आहे हे त्याला माहीत नव्हते. "मला कळण्याआधीच माझ्या घड्याळाने इशारा दिला. मी दुर्लक्ष केल्यावर ते पूर्ण आवाजात वाजू लागले. माझ्या इन्स्ट्रक्टरने ते लगेच ऐकले," असे त्याने सांगितले. या घटनेनंतर क्षितिजने ॲपलचे सीईओ टिम कूक यांना पत्र लिहून आपला अनुभव सांगितला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कूक यांनी त्याला वैयक्तिकरित्या उत्तर दिले.
टिम कूक यांनी लिहिले, "मला खूप आनंद आहे की तुमच्या इन्स्ट्रक्टरने अलार्म ऐकला आणि तुम्हाला त्वरित मदत केली. तुमची कथा आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुरक्षित राहा."
(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)