बांगलादेशात विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या मुद्दावरून सुरू केलेल्या आंदोलनाचा इतका जबरदस्त भडका उडाला की त्याचे चटके शेख हसीना यांनाही सहन करावे लागले होते. शेख हसीना यांना पंतप्रधानपद सोडून बांगलादेशातून पळून जावे लागले होते. काहीशी अशीच परिस्थिती पश्चिम बंगालमध्येही निर्माण झाली आहे. कोलकात्यातील (Kolkata Doctor Murder Case) र.जी.कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर पाशवी अत्याचार करून निर्घृण पद्धतीने ठार मारण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटना रस्त्यावर उतरल्या असून मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ 'नबन्ना' मोर्चा (Nabanna March Kolkata) काढण्यात आला होता. हा मोर्चा विद्यार्थी आणि कामगार संघटनांनी काढला होता.
नबन्ना म्हणजे काय?
पश्चिम बंगालमधील छात्र समाज आणि संग्रामी जौथा मंचने या मोर्चाचे आयोजन केले होते.पश्चिम बंगालमध्ये अराजक निर्माण झाले असून याची जबाबदारी घेत ममता यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. 'नबन्ना' हे पश्चिम बंगालमधील सचिवालयाचे नाव आहे. या मोर्चाचे आयोजन संतरागाछी आणि हावडा मैदानात करण्यात आले होते. हा मोर्चा अडवण्यासाठी सरकारने 6 हजार पोलिसांची फौज तैनात केली होती. तीन पातळ्यांवर सात ठिकाणी पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. या मोर्चाची हाक रवींद्र भारती विद्यापीठातील विद्यार्थी प्रबीर दास, कल्याणी विद्यापीठातील के शुभंकर हलधर आणि सयान लाहिरी यांनी दिली होती. या विद्यार्थ्यांच्या आवाहानला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळेल याची पश्चिम बंगाल सरकारला कल्पना नव्हती. या विद्यार्थ्य्यांनी आपल्याला राजकारणात अजिबात रस नसून पश्चिम बंगालमध्ये पसरलेल्या या अराजकाला ममता बॅनर्जी जबाबदारी असून त्यांनी सत्तेतून पायऊतार व्हावे अशी मागणी केलीय. लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण लवकरात लवकर निकाली काढाले आणि आरोपींना फाशी द्यावी अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी आणि मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा मारा
मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पाण्याचे फवारे मारून आणि अश्रूधुराचा मारा करावा लागला, मात्र तरीही मोर्चेकरी जुमानताना दिसत नव्हते. विद्यार्थी आणि कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी भाजपने उद्या 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे. पश्चिम बंगाल सरकारने हा बंद अवैध असल्याचे म्हण त सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर रहावे असे आदेश दिलेत. जर कर्मचारी हजर राहिले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.