संजय तिवारी, प्रतिनिधी
Early cancer diagnosis : दिनकर सावंत... वयवर्षे 60...तसं पाहायला ते निरोगी होते. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक शरीरात काही त्रास जाणवू लागला. मात्र प्राथमिक पातळीवर दुर्लक्ष केलं. प्रकृती अधिक बिघडली म्हणून रुग्णालयात दाखल केलं तर थेट चौथ्या टप्प्याचं कर्करोगाचं निदान झालं. हे सर्व सावंत कुटुंबांना धक्का देणारं होतं. अचानक कर्करोगाची लागण? तेही चौथ्या टप्प्यावर? त्यानंतर अवघ्या काही महिन्यात त्यांचं निधन झालं. अशा प्रकारच्या घटना भारतातील कित्येत कुटुंबाने अनुभवल्या असतील. कर्करोग बरा होतो, मात्र त्याचं वेळेत निदान होणं आवश्यक आहे. मात्र भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जागतिक वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारे संशोधन भारतातून समोर आले असून आता वेळेआधीच कर्करोगाचे अचूक निदान शक्य होणार आहे. कर्करोगाचे निदान जितके आधी (early detection) तितका उपचाराचा खर्च, त्रास कमी आणि रुग्ण वाचण्याची शक्यता अधिक असते. मात्र, अर्ली साईन नामक या तंत्रज्ञानाने आधीच नेमके निदान होणार असून मानवतेच्या कॅन्सर विरुद्ध लढ्यात हे क्रांतिकारी वळण असल्याचं आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.
आनंदाची आणि अभिमानाची बाब अशी की, नागपुरच्या प्राध्यापक विद्यार्थी जोडगोळीने हे ऐतिहासिक संशोधन केले असून त्याचे US Patent आणि India Patent त्यांना प्राप्त झाले आहे. या तंत्रज्ञानाने मुखाच्या कर्करोगाचं निदान पंधरा मिनिटांत शक्य (Cancer Test) होणार आहे. या ट्रायलमध्ये हे सिद्ध झाले असून येत्या जून-जुलैपर्यंत पहिली किट बाजारात येणार असल्याचे संशोधक डॉ. देवव्रत बेगडे आणि शुभेंदु सिंग ठाकूर यांनी सांगितलं. देशवासियांचे प्राण वाचविण्यासाठी भारत सरकारला हे कर्करोग निदान किट स्वस्त दरात देण्याची इच्छा त्यांनी NDTV मराठीकडे बोलून दाखविली आहे.
नक्की वाचा - Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून नक्कीच होऊ शकतो बचाव, दरवर्षी न चुकता करा हे काम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ. बेगडे सांगतात की, कर्करोगाच्या विरोधात मानवतेच्या लढाईतील ही अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वपूर्ण संशोधन असल्याची आता जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात खात्री पटत चालली आहे. या संशोधनामुळे जगभरात लाखो जीव वाचविण्यात यश मिळू शकेल, अशी खात्री व्यक्त करण्यात येत आहे. आता कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न पाहता केवळ पंधरा मिनिटांत त्याला कर्करोग होणार की नाही, याचं खात्रीलायक निदान करणारं हे तंत्रज्ञान आपल्या भारतात विकसित करण्यात आले असून आपल्या पद्धतीचे हे जगातील पहिले तंत्रज्ञान आहे. त्यामुळे आता कॅन्सर होण्याच्या आधीच त्याचे नेमके निदान शक्य झाले आहे. अर्ली साईन नामक या संशोधनाला अमेरिकेचे पेटंट आणि भारतीय पेटंट देखील मिळाले आहे. या नव्या संशोधनामुळे कर्करोग कधी होईल, किती तीव्रतेची असेल याची आधीच माहिती मिळू शकते.
नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले डॉ. देवव्रत बेगडे सांगतात की, सुमारे पाच वर्षांपूर्वी रसायन शास्त्रात पदवी असलेला विद्यार्थी शुभेंद्र सिंग ठाकूर त्यांच्याकडे एका कामानिमित आला. एखादे संशोधन करण्याची त्याची प्रबळ इच्छा पाहून मी त्याला थुंकीद्वारे कर्करोग निदान विषयावर काम करशील काय, म्हणून विचारलं. त्याने होकारार्थी उत्तर दिलं. तेथून आम्ही कामाला सुरुवात केली. असे जे तंत्रज्ञान अमेरिकेत उपलब्ध आहे ते डीएनए मार्कर आधारित असल्याने नेमके उत्तर न देऊ शकणारे आणि खूप महागडे आहे. आम्ही प्रोटीन मार्करवर काम करून पाहायला हवे, असे मला नेहमीच वाटत होतं. आम्ही कामाला सुरुवात केली आणि दोन वर्षांनी कोविड महामारी आली. त्याकाळात अधिकांश सर्व रुग्णालये फक्त महामारीचे रुग्ण हाताळत होते.
नक्की वाचा - Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?
अशात, मुंबई येथील एका तरुणीला आमच्या संशोधन प्रयोगांबद्दल कुठून तरी कळालं. तिने आमच्याशी संपर्क केला आणि म्हणाली की, सर कोविड सुरू असल्याने रुग्णालयात कर्करोग तपासणी होत नाहीये. माझ्या वडिलांना हल्ली घास गिळायला त्रास होत आहे.तुम्ही ज्या संशोधनावर काम करत आहात, त्याद्वारे माझ्या वडिलांना नेमकी काय समस्या आहे ते कळू शकेल काय, अशी तिने विचारणा केली. आम्ही ते केलं आणि तिथून आत्मविश्वास दुणावला. मग पेटंट हाती आले. आमचे तंत्रज्ञान अमेरिकेच्या तंत्रज्ञानांपेक्षा अधिक नेमके, कमी खर्चिक आणि केवळ पंधरा मिनिटांत रिपोर्ट देऊ शकेल असे आहे. कर्करोग आहे काय, होणार आहे काय हे नेमके कळू शकेल.
याच तंत्रज्ञानात थोडा बदल करीत आणखी बायोमार्कर जोडून आता पाच तऱ्हेच्या कर्करोगांचे निदान थुंकीद्वारे (लाळे द्वारे) करता येईल, असे आमच्या संशोधनात सिद्ध झाले असून त्यावर याच वर्षी क्लिनिकल चाचण्या सुरू होतील अशी महत्त्वाची बातमीदेखील त्यांनी NDTV मराठी सोबत बोलताना दिली.
शुभेंदु सिंग ठाकूर सांगतात, की कर्करोगाच्या उपचारावर देशाचे कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च होतात. याचे कारण, बहुतेक वेळी निदान उशीरा होते. मात्र, वेळीच निदान झाले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक निधी वाचेल. रुग्णांना होणारा त्रास, वैद्यकीय सुविधांवर येणारा ताण वाचेल. तसेच, जीवितहानी कमी करता येईल. याच कारणाने या तंत्रज्ञानामुळे वेळेआधीच मुख कर्करोगाचं निदान झालं तर पैसे, त्रास, जीव वाचण्याची शक्यता वाढणार आहे. येत्या जून-जुलैपर्यंत पहिले किट बाजारात येणार अशी खात्री आहे. आम्ही अर्ली साईन नावाने कंपनी देखील स्थापन केली आहे. येत्या जून-जुलै महिन्यात पहिले किट बाजारात येईल आणि त्याची किंमत सात आठ हजार रुपये न ठेवता फक्त एक हजार रुपयांच्या आत ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, ज्यामुळे आमच्या देशातील लोकांचा खर्च, त्रास तर वाचेल आणि जीव देखील वाचेल.