मोदी सरकार 3.O : नरेंद्र मोदी (Narendra Modi) 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथविधी घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी 8 जून रोजी शपथ घेणार होते. पण, त्यांनी ही तारीख बदलून 9 जून केली आहे. मोदींनी ही तारीख का बदलली? याचा अंदाज ज्योतिषांनी व्यक्त केलाय. 9 जून रोजी जबरदस्त शुभ योग जुळून आल्यानंच शपथविधीची तारीख बदलली असावी, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
ज्योतिषाचार्य डॉ. गौरव कुमार दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार,' 9 जून 2024 रोजी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून रविवार आहे. हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जात आहे. सूर्य आणि मंगळ दोन्ही ग्रह मिळून नव्या सरकारची (New Government) स्थापना झाली तर हे सरकार नक्कीच देशात आणि जगात यश मिळवेल.
( नक्की वाचा : BJP स्पष्ट बहुमतापासून दूर, PM मोदींना करावा लागणार 5 मोठ्या आव्हानांचा सामना )
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीरामाचे भक्त आहेत. त्यादिवशी पुनर्वसू नक्षत्र आहे. श्रीरामांचा जन्मही पुनर्वसू नक्षत्रामध्ये झाला. पुनर्वसू नक्षत्राला शूभ समजलं जातं. या नक्षत्रात ज्यांचा जन्म होतो ते दुसऱ्यांची सेवा करण्यात, त्यांचं भलं करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे पुनर्वसू नक्षत्रात शपथ घेतलेलं सरकार देश आणि नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल.'
ज्याोतिषशास्त्रानुसार शपथविधीसाठी चतुर्थी, नवमी, आमवस्या, चतुर्दशी किंवा पौर्णिमा नसावी. तर रोहिणी, पुष्य, अनुराधा, ज्येष्ठा, मृगशिरा, श्रवण, उत्तराषाढ़ा, रेवती, उत्तराभाद्रपद आणि अश्विनी ही नक्षत्रं अत्यंत शूभ समजली जातात.
(Disclaimer: ही माहिती सामान्य समजुती आणि माहितींवर आधारित आहे. NDTV मराठी याची जबाबदारी घेत नाही. )