भुपेंद्र अंबावणे, मुंबई: वक्फ बोर्ड (Waqf board) विधयेकावरुन पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हिंसाचार सुरु आहे. यावरुन भाजप नेते सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करत आहेत. यावरुनच आता माजी खासदार नवनीत राणा यांनी मोठे विधान केले असून पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता दीदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असा निर्धार व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाल्या नवनीत राणा?
"पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले आहेत. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात जेणे करून हिंदुत्ववादी विचारांना रोखता येईल. हिंदुत्वाला विरोध करून एवढे वर्ष ममता दीदी सत्तेवर बसल्या आहेत. बांगलादेशमध्ये जसे हिंदूंना हाकलून दिले जाते तसे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता दीदी करू पाहत आहेत. पण आता देशात हिंदुत्व विचारांचे सरकार आहे.त्यामुळे त्यांचा प्रयत्न अपयशी होणार आहे. गरज पडली तर हजारो हिंदुत्व विचारांचे कार्यकर्ते पश्चिम बंगाल येथे जाऊन ममता दीदी यांना त्यांची जागा दाखवतील, असे नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
तसेच "धीरेंद्र शास्त्री महाराज जे काम करीत आहेत, हिंदू राष्ट्र म्हणून ज्यांनी जो प्रण केला आहे. त्यासोबत आमच्या सारखे भक्त जोडले गेलो आहोत. त्यांच्यासोबत लाखो भक्त युवक राजकीय लोक जोडली गेले आहेत. गुरुजींच्या या लढ्यात आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे," असेही नवनीत राणा म्हणाल्या. भिवंडीमध्ये त्या माध्यमांशी बोलत होत्या.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना सुद्धा सत्तेत येण्याची घाई झाली असल्याच्या वक्तव्यावरही नवनीत राणांनी प्रतिक्रिया दिली. घमंड चांगल्या चांगल्यांना ताळ्यावर आणून सही रस्त्यावर येण्यापासून रोखतात. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा घमंड आहे की त्यांना रामभक्त कधी पचनी पडत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.