'नायरा एनर्जी'ने देशभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. 1 जुलैपासून कंपनीने पेट्रोलच्या दरात 5 प्रति लीटर आणि डिझेलच्या दरात 3 प्रति लीटर कपात केली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरू लागल्यापासून किरकोळ इंधन दरात कपात करणारी नायरा ही पहिली मोठी कंपनी ठरली आहे. मुंबई तर पेट्रोल 111.21 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे, तर डिझेल- 97.83 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
इंधनाचे दर का कमी झाले?
गेल्या काही आठवड्यांत मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'मधून होणाऱ्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आता हा तणाव निवळला असून जहाजांची वाहतूक पूर्ववत झाली आहे. 1 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 73 डॉलरवर आला आहे. तेल शुद्धीकरण कंपन्यांचा इनपुट खर्च कमी झाला आणि त्याचा थेट फायदा आता खाजगी कंपन्यांनी ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे.
(नक्की वाचा- तुकाराम मुंढेंना हलक्यात घेतलं; नरिमन पॉईंट येथील प्रसिद्ध हॉटेलसह 6 हॉटेल्सला दणका, FDA ची मोठी कारवाई)
देशभरातील 7000 पेट्रोल पंपांवर नवीन दर लागू
नायरा एनर्जीने स्पष्ट केले आहे की, ही दरवाढ कपात देशातील त्यांच्या सर्व सुमारे 7000 इंधन केंद्रांवर लागू झाली आहे. तथापि, वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक कर आणि व्हॅल्यू ॲडेड टॅक्स (VAT) चे प्रमाण वेगवेगळे असल्याने, प्रत्येक राज्यातील अंतिम किरकोळ किंमत भिन्न असू शकते.
मार्च 2026 मध्ये जेव्हा इराण युद्धाच्या संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, तेव्हा नायरा एनर्जीने पेट्रोल 5 आणि डिझेल 3 ने महाग केले होते. आता आंतरराष्ट्रीय बाजार शांत होताच कंपनीने ती वाढ पूर्णपणे मागे घेतली आहे.
(नक्की वाचा- VIDEO: त्र्यंबकेश्वरमध्ये चमत्कार! अमृतकुंडातील लुप्त झालेल्या प्राचीन शिवलिंगाचे अचानक दर्शन)
सरकारी कंपन्याही दर कमी करणार का?
नायराच्या या कपातीनंतर आता ग्राहकांचे लक्ष सरकारी तेल कंपन्यांकडे लागले आहे. मात्र, इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी अद्याप किरकोळ इंधन दरात कोणतीही कपात जाहीर केलेली नाही. दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या (IOC) पंपांवर पेट्रोल अजूनही 102.12 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.20 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ कमी राहिल्यास संपूर्ण क्षेत्रात किंमत कपातीचा दबाव वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.