Ndtv Indian Of The Year 2024 : केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना NDTV इंडियन ऑफ द इयर 2024 मध्ये 'इंडिया फर्स्ट' पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमात जयशंकर यांनी देशाचा परराष्ट्रमंत्री होण्यासाठी हा चांगला कालावधी आहे, असं मत व्यक्त केलं. जयशंकर इतकंच बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी याचं कारण देखील सांगितलं.
'मी अनेक सरकारसोबत काम केलं आहे. तुमच्याकडं देशाला आधुनिक करण्यासाठी दृढ निश्चयानं काम करणारा पंतप्रधान असेल, तर काम करण्याचा आनंद काही औरच असतो, ' असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं.
जयशंकर यांनी पुढं सांगितलं की, ' तुम्ही मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयांवर नजर टाकली तर हा खरोखरच असामान्य काळ आहे. सरकारबरोबर काम करणे आणि त्याचा भाग होते हा मोठा बहुमान आहे. बाह्य आणि देशांतर्गत गतिशीलता खूप जवळ आली आहे.'
'आज देशाच्या दुर्गम भागातही विदेश धोरणांवर चर्चा होते. परराष्ट्रमंत्री म्हणूम मी दर दोन-तीन दिवसांनी भारताबाहेर जात असतो, भारताच्या दूर्गम भागातही मोदी सरकारची पॉलिसी आणि परराष्ट्र धोरणांवर चर्चा होते, असं त्यांनी सांगितलं.
परराष्ट्रमंत्र्यांनी हा मुद्दा समजवताना पुढं सांगितलं की, 'आपण जेव्हा राजकारणी, पत्रकार, खेळाडूंकडं पाहतो, त्यावेळी हे लक्षात येतं. आपण पहिल्यापेक्षा किती तरी जास्त रिप्रेझेटेटिव्ह झालो आहोत. यश हे फक्त महानगरात राहून मिळतं असं नाही. योग्य हेतू आणि योग्य धोरण असेल तर दुर्गम भागातही यश मिळू शकतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपानं आपल्याकडं एक असा पंतप्रधान आहे, जो देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याबरोबरच आधुनिकरणासाठीही काम करत आहे. ते फक्त आवश्यक गोष्टींवर काम करत नाहीत. तर देशाच्या भविष्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणांवरही काम करत आहेत.
संपूर्ण जगाला भारताकडून आशा - वैष्णव
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. जग सध्या अशांततेच्या कालखंडातून जात आहे. जगात दोन युद्ध सुरु आहेत. या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडं आहे. भारताचा विकास दर चांगला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. लोकांचा भारतावर विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं.
इतक्या मोठ्या लोकशाही देशात तिसऱ्यांदा एक सरकार निवडून आले आहे. लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. त्यामुळेच आज देश वेगानं पुढं जातोय, असं वैष्णव यावेळी म्हणाले.
एनडीटीव्हीचे 'एडिटर इन चीफ' संजय पुगालिया यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. या पुरस्कार कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत. 'NDTV इंडियन ऑफ द इयर' हा पुरस्कार द्यायला आम्हाला आनंद होतो. हा खासगी क्षेत्रातील पद्म पुरस्कार आहे, असं मत संजय पुगालिया यांनी यावेळी व्यक्त केलं.