नीट-यूजीमध्ये निवडक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय रद्द करा आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित निकाल लावा अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. दरम्यान नीट परीक्षेतल्या घोटाळ्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. नीट परीक्षेत गोंधळ झालेल्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. आज यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत केंद्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाला पत्र पाठवून केली आहे. सर्व उत्तरपत्रिकांचे (ओएमआर शीट्स) फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली.
नक्की वाचा - '15 मिनिटांमध्ये परत येतो' CBI च्या बोगस गँगनं HDFC च्या खात्यातून गायब केले 85 लाख रुपये
नीट-यूजीचे आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीलाही (एनटीए) पत्र लिहून विद्यार्थी-पालकांच्या शंकांचे निरसन तातडीने करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत विद्यार्थी- पालकांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती.
संशय आणि तक्रार काय ?
नीटच्या परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 गुण मिळाले. त्यातील 8 विद्यार्थी हरियाणातील एकाच केंद्रावरचे आहेत. गतवर्षी केवळ एकाच विद्यार्थ्याला 720 गुण मिळाले होते.