NEET UG 2024 Exam: नीट परीक्षा घोटाळ्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (NTA) खुलासा मागवला आहे. राष्ट्रीय पात्रता तसेच प्रवेश परीक्षेचा National Eligibility cum Entrance Test (NEET) पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून या परीक्षेच्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही परीक्षा रद्द केली जावी, त्याचा निकाल ग्राह्य धरला जाऊ नये आणि परीक्षा पुन्हा घेतली जावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. हीच मागणी करत काही विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी (11 जून) झालेल्या सुनावणीदरम्यान नीट परीक्षेनंतर होणाऱ्या काऊन्सिलिंगला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलैला ठेवण्यात आली असून 8 जुलैपर्यंत एनटीएला आपले उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
(नक्की वाचा: 'मणिपूरचा प्राधान्याने विचार केला पाहिजे', सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता)
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठापुढे नीट परीक्षेसंदर्भातील याचिकांवर सुनावणी झाली. मे महिन्यात नीट परीक्षा झाली होती. या परीक्षेत घोळ झाला असून नीट परीक्षा रद्द करावी, अशी मागणी याचिकांद्वारे करण्यात आली आहे. बार अँड बेंच या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्तींनी याचिकेच्या सुनावणीदरम्यान म्हटले की, "आम्ही काऊन्सिलिंग थांबवणार नाही. तुम्ही यापुढे युक्तिवाद करत राहिलात तर आम्ही ही याचिका इथेच फेटाळून लावू." नीट परीक्षेत घोटाळा झाल्याचा दावा करत विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टाप्रमाणेच दिल्ली आणि कोलकाता उच्च न्यायालयातही याचिका दाखल केल्या आहेत. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, बिहारच्या पाटण्यामध्ये नीटचा पेपर लीक झाला होता आणि राजस्थानामध्ये चुकीचे पेपर देण्यात आले.
(नक्की वाचा: महाराष्ट्रातील नेता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी? कोणकोणत्या नावांची चर्चा?)
4 जून रोजी नीट परीक्षेचा निकाल लागला आणि काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याचे उघडकीस आले होते. या परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग पद्धत असते. म्हणजे उत्तर चुकलं तर गुण कमी होतात, असं असताना पैकीच्या पैकी गुण कसे मिळाले? असा सवाल विचारला जात आहे. नीटची परीक्षा एकूण 720 मार्कांची असते. अचूक उत्तरासाठी 4 गुण दिले जातात तर उत्तर चुकलं तर उत्तरामागे एक गुण कापला जातो. या परीक्षेचा निकाल 14 जूनला लागेल, असं सांगितलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात निकाल 10 दिवस आधी म्हणजे 4 जूनला जाहीर करण्यात आला. यामुळे निकालात घोळ घालण्यात असावा, असा विद्यार्थ्यांना दाट संशय वाटतो आहे. वर्ष 2022 आणि वर्ष 2023चे निकाल पाहिल्यास गेल्या वर्षी पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे फक्त दोन विद्यार्थी होते. 2022 साली ज्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले नव्हते. यावर्षी नीट परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तब्बल 67 इतकी आहे. यातले 6 विद्यार्थी हे हरयाणातील झझ्झरच्या एकाच केंद्रावरील आहेत.
नक्की वाचा: 'हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही', शरद पवारांचा PM मोदींना थेट इशारा
निकालात घोळ असल्याचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळणं हे अशक्य आहे, सर्व प्रश्न सोडवल्यानंतर एक उत्तर जरी चुकले तरी त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त 715 गुण मिळतात, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यावर नीटने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेळेवर देता आली नाही, त्यांचा वेळ वाया गेल्याबद्दल त्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. परीक्षेत कोणताही घोटाळा झालेला नाही, प्रश्नपत्रिकाही फुटलेली असा दावाही नीटने केला आहे.
NEET Exams Scam | 'नीट'मधील सर्वच विद्यार्थ्यांचं पुनर्मूल्यांकन होणार?