प्रांजल कुलकर्णी, प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला होता. त्या टीकेला शरद पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे. 'हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही,' असं पवारांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन होता. त्यानिमित्तानं पक्षातील दोन गटांचे दोन स्वतंत्र कार्यक्रम झाले. अजित पवार गटाचा मुंबईमध्ये मेळावा झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा मेळावा हा अहमदनगरमध्ये झाला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.
आज मोदी गॅरंटी आज राहिलेली नाही, मोदी सरकार राहिले नाही. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या राज्यत तीन महिन्यानी निवडणूक आहे तिथे आपल्याला सरकार आणायचे आहे, जनतेत विश्वास निर्माण करायचा आहे. पंतप्रधान एका पक्षाचा नसतो देशाचा असतो, सर्व जाती, धर्म याचा विचार करायला पाहिजे.. ते विसरले नाही त्यांची विचारधारणा होती, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करतात पण त्याला मर्यादा हव्या. माझ्याबद्दल ते भटकती आत्मा बोलले. हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. नकली बापाची शिवसेना म्हणायचे हे त्यांना शोभते का? पंतप्रधानांनी हे बोलावं का? असा प्रश्न विचारत त्यांना तारतम्य राहिलं नाही, असं पवारांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. 'मी तुम्हाला खात्री देतो आमचे खासदार जनतेसाठी लढतील, असं पवारांनी सांगितलं. हे आठही सदस्य म्हणजे अष्टप्रधान मंडळ असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
( नक्की वाचा : NCP मेळाव्यात शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भावुक, म्हणाले.... )
काय म्हणाले होते मोदी?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पंतप्रधानांनी कुणाचंही नाव न घेता जोरदार टीका केली आहे.'मी जे बोलतोय ते कोणी स्वत:हून आपल्या डोक्यावर घेऊ नये. आमच्याकडे म्हणतात की काही अतृप्त आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात त्यांचे आत्मे फिरत राहतात. स्वत:चं काम नाही झालं तर त्यांना इतरांचे काम बिघडवण्यात त्यांना आनंद मिळतो. महाराष्ट्रही अशा अतृप्त आत्म्यांचा शिकार झाला आहे.
इथल्या एका मोठ्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षेसकाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एका अस्थिरतेच्या काळात गेला. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. हे विरोधकांनाच अस्थिर करत नाही तर ते आपल्या स्वत:च्या पक्षामध्येही असेच करतात.
( नक्की वाचा : जागावाटपाचं गुऱ्हाळ लवकर संपवा अन्यथा... राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांचा थेट इशारा )
हे आत्मे परिवारातही असेच करतात. 1995 मध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आले तेव्हाही हा आत्मा त्या सरकारला अस्थिर करण्याचे काम करत होती. 2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा अपमान केला. आज महाराष्ट्रालाच अस्थिर करण्यात संतोष होत नसून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ सुरू आहे. आज देशाला अशा भटकत्या आत्म्यांपासून बचाव करण्यासाठी स्थिर मजबूत सरकारच्या दिशेने पुढे जाणे गरजेचे आहे,' अशी टीका पंतप्रधानांनी केली होती. पंतप्रधानांनी यामध्ये शरद पवारांचं नाव घेतलं नसलं तरी त्यावर विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी जोरदार टीका केली होती. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही शरद पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world