
नेपाळमध्येही अखेर जेन-जी (Gen-Z) आंदोलनाने सरकार पाडले. देशात सत्तापालट झाला आहे. नेपाळ हा भारताला लागून असलेला शेजारील देश आहे. शिवाय असा चौथा देश आहे जिथे तरुणाईने सत्तापालट केला आहे. केवळ 48 तासांत के.पी. शर्मा ओली यांच्यासह देशातील अनेक मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. सोशल मीडिया बंदीमुळे संपूर्ण देश हादरला आणि देशातील परिस्थिती अस्थिर झाली. 2021 मध्ये म्यानमारपासून याची सुरुवात झाली. त्यानंतर श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि आता नेपाळ, तरुणाईच्या रोषाच्या ठिणगी या देशांमध्ये अशी आग लावली, ज्यात सर्व काही जळून खाक झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
सातत्याने अस्थिरतेचे वातावरण
भारताच्या शेजारील देशांमध्ये गेल्या काही वर्षांत देशांतर्गत कारणांमुळे झालेल्या आंदोलनांनी या देशांमध्ये राजकीय उलथापालथ घडवून आणली. त्याचबरोबर दक्षिण आशियातील स्थिरताही प्रभावित केली आहे. बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांनी हे सिद्ध केले आहे, की भारताच्या शेजारील राजकीय परिस्थिती आणि वातावरण अत्यंत अस्थिर आहे.
बांगलादेशात सत्तासंघर्ष
बांगलादेशात 2022 पासून वातावरण अशांत होऊ लागले होते. परंतु मे 2024 मध्ये जनतेचा रोष उफाळून आला. मे 2024 मध्ये राजधानी ढाका आणि इतर अनेक शहरांमध्ये शेख हसीना यांच्या सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. आंदोलकांची मागणी होती की अवामी लीग आणि त्यांच्या विद्यार्थी संघटनेवर बंदी घालावी. आंदोलकांचा आरोप होता की ही पार्टी दीर्घकाळापासून सत्तेवर आहे. शिवाय ते विरोधी पक्षांना कमकुवत करत आहे. तसेच, त्यांच्याशी संबंधित विद्यार्थी संघटना हिंसा आणि गैर कारवायांना प्रोत्साहन देत आहेत. सरकारने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण ते अयशस्वी झाले. ऑगस्ट 2024 मध्ये अखेर हसीना यांना देश सोडून जावे लागले.
इम्रानच्या अटकेने समर्थक भडकले
भारताचा शत्रू आणि अणुशक्ती संपन्न पाकिस्ताननेही गेल्या दोन वर्षांत दोन मोठ्या आंदोलनांचा अनुभव घेतला आहे. मे 2023 मध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेमुळे संपूर्ण पाकिस्तान पेटून उठला. लाहोरपासून इस्लामाबाद आणि रावळपिंडीपर्यंत त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. सरकारी इमारती, पोलीस चौक्या आणि अगदी लष्करी आस्थापनांवरही हल्ले झाले. अनेक शहरांमध्ये कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली. इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानातही अस्थिरता होती. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानच्या इतिहासातील ही एक अशी असामान्य वेळ होती, जिथे जनतेचा रोष थेट लष्करावर होता. या आंदोलनाने हे संकेत दिले की पाकिस्तानच्या राजकारणात आणि सत्तेवर किती मोठे संकट आहे. हे आंदोलन इम्रान खान यांना सत्तेतून हटवल्यानंतर जवळजवळ एक वर्षाने तोशाखाना प्रकरणात अटक करण्यात आल्यावर झाले. इम्रान अजूनही तुरुंगात आहेत. या आंदोलनात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर हजारो लोकांना अटक करण्यात आली.
Nepal PM Resigns : नेपाळमध्ये ‘Gen-Z' आंदोलनाचा मोठा झटका, पंतप्रधान केपी ओलींनी दिला राजीनामा
श्रीलंकेत ही रोष उफाळला
भारताचा आणखी एक शेजारी, श्रीलंकेत 2022 मध्ये मोठी आंदोलने झाली. भयंकर आर्थिक संकटानंतर देश हळूहळू सुधारणा करण्याच्या प्रयत्नात होता. पण जनता नाराज होती. राजधानी कोलंबो, कैंडी आणि इतर अनेक शहरांमध्ये हजारो लोकांनी वीज कपात, महागाई, इंधनाच्या किमती वाढणे आणि बेरोजगारीच्या विरोधात निदर्शने केली. अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराविरोधातही घोषणाबाजी झाली. या आंदोलनाचा पाया मार्च 2022 मध्येच रचला गेला होता. श्रीलंकेत झालेल्या या आंदोलनाला अरगालया आंदोलन असे नाव देण्यात आले होते. आंदोलनादरम्यान जनता थेट राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानात घुसली आणि तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांना देश सोडून पळून जावे लागले. सध्या माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.
म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरुद्ध लढा
फेब्रुवारी 2021 मध्ये भारताच्या ईशान्येकडील भागाला लागून असलेल्या म्यानमारमध्ये लष्करी सत्तापालट झाला. तेव्हापासून देशातील परिस्थिती सातत्याने अस्थिर आहे. जनता लोकशाहीच्या पुनर्संस्थापनेसाठी संघर्ष करत आहे. 2025 मध्येही विद्यापीठे, मंदिरे आणि शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. विद्यार्थी, नागरिक गट आणि भिक्षूंनी लष्कराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. सत्तापालट झाल्यापासून देशाच्या नेत्या आंग सान सू की तुरुंगात आहेत. लष्कर सत्तेवर कायम आहे. देशातील या परिस्थितीत अटक, गोळीबार, इंटरनेट ब्लॅकआउट आणि माध्यमांवर निर्बंध घालणे सामान्य आहे. देशावर आंतरराष्ट्रीय दबावही वाढत आहे. पण लष्करी राजवट अजूनही सक्तीने सत्तेवर आहे. 2021 मध्ये झालेल्या या आंदोलनाला स्प्रिंग रेव्होल्यूशन असे म्हटले जाते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world