New Bank Nomination Rules 2025: बँक नॉमिनेशन नियमांत मोठा बदल, सगळी कटकट संपणार

New Bank Nomination Rules 2025: या नवीन नियमांमुळे ठेवीदारांना त्यांच्या आवडीनुसार एकापेक्षा जास्त वारसदार (नॉमिनी) निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

New Bank Nomination Rules 2025: बँक ग्राहकांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेच्या नॉमिनेशनसंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. हे बदल 1 नोव्हेंबरपासून लागू होणार असून याचा फायदा सगळ्या बँक खातेधारकांना होणार आहे. ज्या ग्राहकांनी बँकेत लॉकर घेतले आहेत, त्यांनाही या बदलांमुळे दिलासा मिळणार आहे. 'बँकिंग कायदे सुधारणा अधिनियम 2025' अंतर्गत नामनिर्देशनाचे म्हणजेच नॉमिनेशनचे नियम बदलले आहेत. या नियम बदलांमुळे ग्राहकांची मोठी डोकेदुखी दूर होणार आहे. 

नक्की वाचा: सोन्याचे दागिने की कॉईन? गुंतवणुकीसाठी काय आहे अधिक फायदेशीर?

बँक खात्याच्या नॉमिनेशनबद्दलचा बदल नेमका काय आहे?

यापूर्वी बँक खातेदार त्यांच्या ठेवी आणि लॉकरसाठी फक्त एकाच व्यक्तीला वारसदार (नॉमिनी) ठेवू शकत होते. ज्या व्यक्तीला नॉमिनेशन दिलं आहे त्या व्यक्तीचे निधन झाल्यास बऱ्याच कटकटी निर्माण होत होत्या. अनेकदा या मुद्दावरून कुटुंबामध्ये वादही निर्माण होत होते. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सरकारने नॉमिनेशनची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून बँक खातेधारक एकाऐवजी चार नॉमिनी नेमू शकतील. बँकेमध्ये लॉकर असेल तर त्यासाठीही ग्राहक 1 नोव्हेंबरपासून 4 नॉमिनी नेमू शकतील. बँक ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार वारसदार निवडता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खातेधारकाच्या मृत्यूनंतर पैसे त्याच्या वारसांना मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद करणे, सोपी आणि पारदर्शक व्हावी हा या बदलांमागचा मूळ उद्देश आहे. 

बँक नॉमिनीबद्दलचे नियम 1 नोव्हेंबरपासून बदलणार

  1. बँक ग्राहक यापूर्वी फक्त एकाच व्यक्तीला नॉमिनी म्हणून नियुक्त करू शकत होता, बँक नियमांतील बदलांमुळे ग्राहक आता 4 व्यक्तींना नॉमिनी करू शकेल.  
  2. ठेवी धारकही चार नॉमिनी नेमू शकतात. यामध्ये ठेवी धारक प्रत्येक नॉमिनीला किती रक्कम मिळावी याचा वाटा ठरवू शकतो किंवा एकानंतर दुसरा अशा पद्धतीने नॉमिनींचा क्रम ठरवू शकतो
  3. सिक्युरिटीज आणि सेफ्टी लॉकरसाठीसाठी मात्र नॉमिनी नेमत असताना क्रम ठरवून तसे नॉमिनेशन देता येईल, म्हणजे पहिल्या नॉमिनीचे निधन झाले किंवा त्याने हिस्सा नाकारला, त्यावर पाणी सोडलं तर तो हिस्सा दुसऱ्या क्रमांकाच्या नॉमिनीला जाईल. 
  4. या बदलांमुळे बँक खातेधारक नॉमिनी नेमत असताना प्रत्येक नॉमिनीला किती हिस्सा द्यायचा हे देखील ठरवू शकेल. ज्यामुळे ठेवीधारकाच्या मृत्यूनंतर कोणताही वाद उद्भवणार नाही. 
  5. सिक्युरिटीज आणि सेफ्टी लॉकरसाठी नॉमिनी नेमत असताना ग्राहक त्याच्या पसंतीनुसार नॉमिनींची नावे ठरवू शकतो, त्यामुळे ती रक्कम, लाभ कोणाला मिळावा हे आधीच निश्चित करणे सोपे जाईल. 

नक्की वाचा: PF मधून 100 % रक्कम काढता येणार; कोणत्या कारणांसाठी पैसे काढू शकता? काय आहे नवी नियमावली?

नॉमिनेशनच्या नियम बदलांमुळे काय होईल ?

या नवीन नियमांमुळे ठेवीदारांना त्यांच्या आवडीनुसार वारसदार (नॉमिनी) निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. त्याचबरोबर, संपूर्ण बँकिंग व्यवस्थेत दाव्याचे पैसे देण्याची प्रक्रिया (Claim Settlement) एकरूप, पारदर्शक आणि जलद गतीची होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. एकापेक्षा जास्त वारसदार नेमण्यासाठी, रद्द करण्यासाठी किंवा हिस्सा निश्चित करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरायची आणि त्यासाठीचे अर्ज (फॉर्म्स) कसे असतील, याची सविस्तर माहिती देणारी 'बँकिंग कंपन्या (नामांकन) नियम, 2025' पुस्तिका लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व बँकांमध्ये हे नियम एकसमान पद्धतीने लागू होण्यासाठी ही पुस्तिका निघणे गरजेचे आहे.