Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून बदलणार इनकम टॅक्सचे गणित, Old Or New Tax Regime; तुमच्या फायद्याचे काय?

New Income Tax Act 2025: सीए अमित कुमार यांनी करदात्यांना सल्ला देत म्हटलंय की, 1 एप्रिलपूर्वी करदात्यांनी आपल्या सीएची भेट घ्यावी, त्यांचा सल्ला घ्यावा आणि टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर नक्की करावा.

जाहिरात
Read Time: 3 mins
"New Income Tax Act 2025: इनकम टॅक्सच्या नियमांमध्ये कोणते बदल होणार आहेत?"
Canva

New Income Tax Act 2025: जर तुम्हीही तुमच्या पगार आणि टॅक्स बचतीबाबत चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. काही दिवसांतच नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून 1 एप्रिलपासून देशात 'इनकम टॅक्स ॲक्ट, 2025' लागू होणार आहे. हा नवीन कायदा अमलात आल्यानंतर प्रत्येक करदात्यासमोर एक मोठा प्रश्न असेल की 'नवी कर प्रणाली' (New Tax Regime) स्वीकारायची की 'जुन्या कर प्रणाली'कडे (Old Tax Regime) वळायचे?

गुरुग्राममधील एका फर्ममध्ये ACFO म्हणून कार्यरत असलेले सीए अमित कुमार यांनी सांगितले की, अलीकडच्या बजेटनंतर असे वाटत होते की नवी कर प्रणालीच सर्वोत्तम आहे. कारण त्यात कागदपत्रांची कमी प्रमाणात आवश्यकता तसेच सवलतही आहे. पण नवीन नियमांनुसार जुन्या कर प्रणालीत असे काही बदल केले आहेत, ज्यामुळे हा पर्याय पुन्हा एकदा आकर्षक वाटतोय. 

Advertisement

नवी कर प्रणाली: कमी कटकट आणि सोपे दर

सीए अमित कुमार यांच्या मते, नवी कर प्रणाली अशा लोकांसाठी उत्तम आहे ज्यांना गुंतवणुकीच्या (उदा. LIC, PPF इत्यादी) कटकटीत पडायचे नाही. यामध्ये कराचे दर कमी आहेत आणि 12 लाख रुपयांपर्यंतच्या निव्वळ उत्पन्नावर 'कलम 87A' अंतर्गत पूर्ण सवलत (Rebate) मिळते. पण दुसरीकडे तोटा असा की, यात तुम्हाला घरभाडे भत्ता (HRA) किंवा 80C यासारख्या मोठ्या कपातीचा फायदा मिळत नाही. ही प्रणाली 'टॅक्स फाइल करा आणि टेन्शन फ्री राहा' असे धोरण असणाऱ्यांसाठी आहे.

जुन्या कर प्रणालीत काय बदलले?

इनकम टॅक्स ॲक्ट, 2025ने जुनी कर प्रणाली अशा लोकांसाठी अधिक प्रभावी बनवलीय जे विचारपूर्वक गुंतवणूक करतात. यातील तीन मोठे बदल तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात

1. HRA ची व्याप्ती वाढली

पूर्वी बंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद यासारख्या शहरांमध्ये मूळ पगाराच्या (Basic Salary) केवळ 40 टक्के HRA सूट मिळत असे. आता ती वाढवून दिल्ली-मुंबईप्रमाणे 50 टक्के करण्यात आली आहे. यामुळे या शहरांत राहणाऱ्या नोकरदारांची मोठी बचत होईल.

ऑफिसकडून मिळणाऱ्या 'मील कूपन'ची मर्यादा 50 रुपयांवरुन वाढवून 200 रुपये करण्यात आली आहे. भेटवस्तूंवर (Gift) मिळणारी सूट 5,000 रुपयांवरून 15,000 रुपयांवरून करण्यात आली आहे. याशिवाय मुलांचे शिक्षण, हॉस्टल खर्च आणि मोबाइल लीजिंग यासारख्या भत्त्यांवरही आता जास्त सूट मिळेल.

Advertisement

(नक्की वाचा: Social Media KYC: नेटकऱ्यांना मोठा झटका, फेसबुक-इन्स्टा वापरायचं असेल तर KYC अनिवार्य? संसदीय समितीची शिफारस)

तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा वार्षिक पगार 20 लाख रुपये असेल आणि तुम्ही या सर्व नवीन सवलतींचा (HRA, मील कूपन, गिफ्ट इ.) योग्य वापर केला, तर तुम्ही नव्या प्रणालीच्या तुलनेत जुन्या कर प्रणालीत 1.25 लाख रुपयांपर्यंत अधिक बचत करू शकता.

तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य ठरेल?

सीए अमित कुमार यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय पूर्णपणे तुमचा पगार आणि तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. जर तुम्ही गुंतवणूक करत नसाल आणि पगार कमी असेल, तर नवी प्रणाली सोपी आहे. पण जर तुमचा पगार जास्त असेल, तुम्ही होम लोनचे हप्ते फेडत असाल किंवा मोठ्या शहरात भाड्याने राहत असाल, तर जुनी कर प्रणाली तुमच्या बँक बॅलेन्ससाठी फायदेशीर ठरू शकते.

Advertisement

सीए अमित कुमार यांनी करदात्यांना मोलाचा सल्ला दिला आहे: "1 एप्रिलपूर्वी आपल्या सीएचा सल्ला घ्या आणि टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर जरूर करा. लक्षात ठेवा, योग्य निवडच तुमच्या कष्टाची कमाई टॅक्सच्या माऱ्यापासून वाचवू शकते."