NEET Paper Leak : देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षांपैकी एक असलेल्या'नीट' (NEET-UG) परीक्षेची प्रश्नपत्रिका नेमकी कशी फुटली, याचा अत्यंत थक्क करणारा आणि धक्कादायक कट अखेर उघडकीस आला आहे. कोणत्याही हायटेक चोरीशिवाय किंवा पेपरची पाकिटे न फोडता, केवळ शिक्षकांच्या तल्लख स्मरणशक्तीच्या बळावर हा संपूर्ण पेपर बाहेर आला होता. कडक बंदोबस्तातील सुरक्षेच्या त्रुटींचा फायदा घेत, प्रश्न पाठ करून ते लाखो रुपयांना विकणाऱ्या या रॅकेटचा सीबीआयने (CBI) पर्दाफाश केला असून, या प्रकाराने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अशी उघडकीस आली पेपर फुटण्याची शक्कल
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) पॅनेलवर असणारे रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी, भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा गुरुकुल मांढरे आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा संजय हवालदार या तिघांकडे प्रश्नपत्रिका तयार करणे आणि तिचे मराठीत भाषांतर करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पेपर तयार करताना या तिघांनाही अत्यंत सुरक्षित वातावरणात ठेवले जायचे. मात्र, काम पूर्ण झाल्यावर त्यांना रोज घरी जाण्याची सवलत देण्यात आली होती. याच गोष्टीचा गैरफायदा या तिन्ही प्राध्यापकांनी घेतला.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: 'नीट'मध्ये कोऱ्या उत्तरपत्रिकेचा खेळ? उत्तरं भरण्यासाठी 20 लाखांचा रेट, वाचा कसं चालतं रॅकेट )
स्मरणशक्तीच्या जोरावर तयार केली प्रश्नपेढी
पेपर तयार करण्याचे काम करत असताना या तिन्ही शिक्षकांनी दिवसभरात अंतिम प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न नीट लक्षात ठेवून पाठ केले. घरी परतल्यानंतर त्यांनी हे सर्व प्रश्न कागदावर लिहून काढले आणि एक विशेष प्रश्नपेढी तयार केली. त्यानंतर पुण्यातील त्यांच्या खासगी कोचिंग क्लासेसमधील काही निवडक विद्यार्थ्यांना हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे (Very Important) असल्याचे सांगून अभ्यासासाठी दिले. या विद्यार्थ्यांनाही हे प्रश्न थेट येणाऱ्या नीट परीक्षेतीलच आहेत, याची साधी पुसटशी कल्पनाही नव्हती.
ब्युटीशियन, दलाल अन् लाखो रुपयांचा व्यवहार
या संपूर्ण प्रकरणात खरी वळणवाट आली ती एका ब्युटीशियनमुळे. या शिक्षकांच्या ओळखीच्या असलेल्या मनीषा वाघमारे या ब्युटीशियन महिलेने कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांकडून ही प्रश्नपेढी अत्यंत हुशारीने हस्तगत केली. तिने ते सर्व प्रश्न कॉम्प्युटरवर टाईप करून एक संपूर्ण प्रश्नपत्रिका तयार केली आणि ती धनंजय लोखंडे नावाच्या व्यक्तीला विकली.
धनंजयने पुढे देशभरातील विविध राज्यांतील दलालांचे नेटवर्क वापरून ही प्रश्नपत्रिका इतर दलालांना आणि विद्यार्थ्यांना लाखो रुपयांना विकली. जर मनीषा वाघमारेने ही प्रश्नपत्रिका पुढे पसरवली नसती, तर हा सर्व गैरप्रकार कधीच समोर आला नसता.
सीबीआयकडून 13 जणांना अटक
हा पेपर एका विद्यार्थ्याच्या हाती लागल्यानंतर त्याने थेट एनटीषेकडे (NTA) तक्रार केली, ज्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने अत्यंत वेगाने कारवाई करत अवघ्या काही दिवसांत या संपूर्ण कटाचा छडा लावला.
या प्रकरणात 3 प्राध्यापक, ब्युटीशियन मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, कोचिंग क्लासशी संबंधित व्यक्ती आणि दलालांसह एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने या आरोपींचे बँक खाते, लॉकर आणि डिमॅट खाती गोठवली असून, भविष्यात प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या आणि भाषांतर करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या असाव्यात, अशी महत्त्वाची शिफारस एनटीएला केली आहे.