जाहिरात

NEET Paper Leak: 'नीट'मध्ये कोऱ्या उत्तरपत्रिकेचा खेळ? उत्तरं भरण्यासाठी 20 लाखांचा रेट, वाचा कसं चालतं रॅकेट

NEET Paper Leak : नीट परीक्षेत पेपर लीकच्या घटनांनी आधीच खळबळ उडाली असताना आता कॉपी किंवा गैरव्यवहाराची एक अशी 'मोडस ऑपरेंडी' समोर आली आहे,

NEET Paper Leak: 'नीट'मध्ये कोऱ्या उत्तरपत्रिकेचा खेळ? उत्तरं भरण्यासाठी 20 लाखांचा रेट, वाचा कसं चालतं रॅकेट
NEET Paper Leak : या टोळीचा दावा असा आहे की, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळवून दिले जाते. 
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी 


NEET Paper Leak : वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' (NEET) परीक्षा पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पेपर लीकच्या घटनांनी आधीच खळबळ उडाली असताना आता कॉपी किंवा गैरव्यवहाराची एक अशी 'मोडस ऑपरेंडी' समोर आली आहे, ज्याचा विचार करूनही कोणाचेही डोळे विस्फारतील. "तुम्ही फक्त परीक्षा केंद्रावर जा, ओएमआर (OMR) शीट कोरी सोडा, बाकी आम्ही बघून घेतो," असा अजब आणि तितकाच धक्कादायक सल्ला देणारी एक टोळी सध्या सक्रिय असल्याचे समोर आले असून यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

काय आहे प्रकरण?

NEET परीक्षेतील या नव्या घोटाळ्याचा खुलासा अहमदाबादमधील एका सतर्क विद्यार्थ्याने केला आहे. या विद्यार्थ्याने एका मध्यस्थासोबत झालेले आपले संशयास्पद संभाषण स्वतः रेकॉर्ड केले आणि त्यावरून या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीचा दावा असा आहे की, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळवून दिले जाते. 

त्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आधीच 'मॅनेज' केलेले असते. विद्यार्थ्यांना सूचना दिली जाते की त्यांनी उत्तरपत्रिकेवर (OMR शीट) पेनने कोणतेही गोळे भरू नयेत, ती कोरीच ठेवावी. परीक्षा संपल्यानंतर संबंधित केंद्रावरील लोक संगनमताने ती उत्तरपत्रिका हवी तशी भरून देतात आणि पुढे पाठवतात.

( नक्की वाचा : Akola News: NEET पेपरफुटीचे धागेदोरे अकोल्यात; आरसीसीच्या शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात )
 

20 लाख रुपयांचा रेट आणि...


या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या मध्यस्थांनी या संपूर्ण 'सेटिंग'साठी सुमारे 20 लाख रुपयांचा दर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, कोणाला संशय येऊ नये म्हणून ही टोळी विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण न देता, केवळ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल इतपतच गुण वाढवून देण्याचे आश्वासन देते. 

एखादा विद्यार्थी आधीच हुशार असेल किंवा त्याचे काही मार्क्स स्वतःच्या कष्टाने मिळवण्याची क्षमता असेल, तर या 20 लाख रुपयांच्या रकमेवर घासाघिस किंवा सौदेबाजी करण्याची मुभाही हे मध्यस्थ देतात. "ओएमआर एजन्सी आणि सरकारमध्ये आमची माणसं आहेत," असा खळबळजनक दावा या रॅकेटमधील व्यक्तींकडून केला जात आहे.

(नक्की वाचा : NEET Paper Leak : नीट गैरप्रकारात पुण्यातील 5 प्राध्यापक CBI च्या रडारवर; कोचिंग सम्राटांचे कनेक्शन उघड )

दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत रॅकेटचे जाळे

गुजरात सायबर सेलकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, हे रॅकेट केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून त्याचे जाळे दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत पसरलेले असण्याची शक्यता आहे. तक्रारदार विद्यार्थ्याने ट्रू-कॉलरवर 'आरव सिंग' असे नाव दिसणाऱ्या व्यक्तीशी व्हॉट्सॲप कॉलवर संवाद साधला होता. या संवादादरम्यान त्या व्यक्तीने दिल्लीतील परीक्षा केंद्रावर सेटिंग करून देण्याचे कबूल केले होते. 720 पैकी 720 मार्क्स मिळवून देण्यापासून ते राज्याच्या कट-ऑफच्या पलीकडे गुण नेण्यापर्यंतचे विविध 'पॅकेज' या रॅकेटमध्ये उपलब्ध असल्याचे समोर आले आहे.

Latest and Breaking News on NDTV

पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

या धक्कादायक माहितीमुळे नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ज्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, तिथे केवळ पैशाच्या जोरावर कोरी उत्तरपत्रिका भरून डॉक्टर होता येत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. 

संबंधित विद्यार्थ्याने या प्रकरणाचे सर्व पुरावे, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि स्क्रीनशॉट सायबर सेलला दिले असून या रॅकेटचे मूळ शोधून काढण्याची मागणी केली आहे. आता यावर तपास यंत्रणा काय कारवाई करतात आणि खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com