विरोधकांच्या एका चुकीचा प्रत्येक निवडणुकीत होतोय मोदींना फायदा!

विरोधकांनी केलेल्या एका समान चुकीचा प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदींना फायदा होतोय.

जाहिरात
Read Time: 3 mins
नरेंद्र मोदी
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर आता वाढू लागलाय. यंदाच्या निवडणुकीत सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडं नरेंद्र मोदी हा प्रमुख चेहरा आहेत. तर 'मोदी हटाव' या  समान ध्येयानं विरोधी पक्ष इंडिया आघाडीमध्ये एकत्र आले आहेत. 

मोदी सरकारच्या दहा वर्षाचा कारभार हा या निवडणुकीतील मुख्य मुद्दा आहे. पंतप्रधान गेल्या दशकभरातील उपलब्धी सांगत असताना विरोधक त्यांच्या दाव्यातील फोलपणा मतदारांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. विरोधी आघाडीची पाटणामधील ऐतिहासिक गांधी मैदानात झालेली सभा या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरणार अशी सध्या चर्चा आहे.

Advertisement

पाटणामध्ये काय झालं?

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पाटणामधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक टीका केली. 'पंतप्रधान मोदींना कुटुंब नसेल तर आम्ही काय करु?' असा प्रश्न लालूंनी या सभेत विचारला होता.

Advertisement

लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या या टिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीनं उत्तर दिलं. '140 कोटी भारतीय माझा परिवार आहेत. ज्यांना कुणी नाही ते देखील मोदींचे आहेत आणि मोदी त्यांचा आहे,' असं मोदींनी तेलंगणामधील सभेत सांगितलं.

Advertisement
मोदींच्या या सभेनंतर भाजपाच्या प्रचाराची दिशा बदललीय. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपल्या नावाच्या पुढे 'मोदी का परिवार' असं लिहिण्यास सुरुवात केली.


पाच वर्षांपूर्वी काय झालं होतं?

 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर राफेल मुद्द्यावर 'चौकीदार चोर है' अशी टीका केली होती. त्याला मोदींनी 'मैं भी चौकीदार' असं उत्तर दिलं. भाजपानं संपूर्ण प्रचाराचाच हा मुद्दा केला.


भाजपाच्या या प्रचाराचा त्यांना मोठा फायदा झाला. पुन्हा एकदा भाजपाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळालं.  भाजपानं 2014 पेक्षाही जास्त 303 जागा जिंकल्या. तर, काँग्रेसला फक्त 52 जागांवर समाधान मानावं लागलं.

'चायवाला' विरुद्ध 'चाय पे चर्चा'

नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. त्यावेळी मोदींच्या उमेदवारीवर बोलताना काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी त्यांची 'चायवाला' अशी हेटाळणी केली होती. इतकंच नाही तर त्यांनी मोदींना काँग्रेस कार्यालयासमोर चहाचा स्टॉल उघडण्याचा प्रस्ताव दिला होता.

मोदींनी अय्यर यांच्या या टीकेचाही प्रमुख निवडणूक मुद्दा केला. भाजपा कार्यकर्त्यांनी जागोजागी 'चाय पे चर्चा' आयोजित करत मतदारांना आपल्या बाजूनं वळवण्यास सुरुवात केली. भाजपानं 2014 साली 282 जागासंह स्पष्ट बहुमत मिळवत तब्बल दहा वर्षांनी केंद्रातील सत्तेत पुनरागमन केलं.

सोनिया गांधींनीही केली होती चूक
 

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 2007 साली गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींवर 'मौत का सौदागर' अशी टीका केली होती. मोदींनी त्याला संसदेवर हल्ला करणारे मौत का सौदागर आहेत, असं उत्तर दिलं. 


सोनिया गांधीची टीका गुजरातच्या जनतेला आवडली नसल्याचं त्या निवडणुकीच्या निकालात सिद्ध झालं. भाजपानं आपला बालेकिल्ला आणखी मजबूत केला.

नीच आणि रावण

मणिशंकर अय्यर यांनी 2017 साली गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मोदींवर 'नीच आदमी' अशी टीका केली होती. अय्यर यांची टीकेनं काँग्रेसचं मोठं नुकसान झालं. मोदींनी या टीकेला गरीब आणि मागस वर्गाचा अपमान असल्याचं सांगत गुजरात विधानसभेत पुन्हा एकदा बहुमत मिळवलं.


गुजरातमध्ये 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींना 100 तोंडाचा रावण म्हंटलं होतं. मोदींनी प्रत्येक सभेत खर्गे यांच्या या टीकेला उत्तर दिलं. त्यानंतर भाजपाला गुजरात विधानसभेत आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त जागा मिळाल्या. 

Topics mentioned in this article