संसदेत 'ऑपरेशन सिंदूर' या विषयावर आज चर्चा सुरू आहे. त्याच वेळी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा मुख्य आरोपी सुलेमान शाह याचा खात्मा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत दहशतवादी अबू हमजा आणि यासिर हे देखील मारले गेले आहेत. सुरक्षा दलांना हे दहशतवादी बऱ्याच काळापासून हवे होते. सरकारने सुलेमान शाहवर 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
या कारवाईबाबत लष्कराच्या चिनार कॉर्प्सने त्यांच्या 'एक्स' हँडलवर माहिती दिली आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मते, गुप्तचर माहितीच्या आधारे लिडवास परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अनेक तास चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. सध्या या परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू आहे, अशी माहिती ही देण्यात आली आहे.
नक्की वाचा - Devendra Fadnavis: ' आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार', CM फडणवीस यांची घोषणा
'ऑपरेशन महादेव' हे अलीकडच्या काळात काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाविरुद्धची एक मोठी मोहीम मानली जाते. या ऑपरेशन मुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यात आले. हे ऑपरेशन या गोष्टीचे संकेत देते की, लष्कर आणि इतर सुरक्षा दल दहशतवादाला मुळापासून संपवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. शिवाय त्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी अचूक रणनीतीसह कार्यरत आहेत हेच स्पष्ट झाले आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन मैदानात पाकिस्तान-समर्थित लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 लोक मारले गेले होते. या हल्ल्यानंतर, दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये दहशतवाद्यांचे वाईट इरादे हाणून पाडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी गुप्तचर माहितीचा वापर केला जात आहे. त्या दृष्टीने दहशतवाद्यांना चाप बसवला जात आहे.