ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून पाकिस्तानकडून भारताच्या सीमेभागात हल्ले सुरूच आहेत. 8 मेच्या मध्यरात्रीतही पाकिस्तानने अनेक भागात ड्रोन हल्ले केले. भारतीय सैन्याने पाकिस्तानचा प्रत्येक डाव उधळून लावला आहे.
दरम्यान 8 मेच्या मध्यरात्री पाकिस्तानची सीमा ओलांडत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सीमा सुरक्षा दलाने बीएसएफने हा प्रयत्न हाणून पाडला आहे. जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये रात्री 11 वाजता एक मोठ्या घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. दरम्यान एक व्हिडिओ भारतीय सैन्याने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक ड्रोन उद्ध्वस्त होताना दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यामध्ये भारतीय सैन्याने लिहिलंय, पाकिस्तान सशस्त्र बलाने 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री संपूर्ण पश्चिमी सीमेवर ड्रोन आणि अन्य शस्त्रांनी हल्ले केले होते. पाकिस्तान सैनिकांनी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर अनेक संघर्ष विराम उल्लंघन केलं होतं. ड्रोन हल्ला प्रभावीपणे हाणून पाडण्यात आला आणि सीव्हीएफने याला प्रत्युत्तर दिलं.
भारतीय सैन्य दल पाकिस्तान्यांना उत्तर देत असतानाच दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांसोबत बैठक घेतली आणि सीमेवरील तयारीचा आढावा घेतला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने हल्ला सुरू केल्यानंतर भारताची सज्जता काय आहे याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. पाकिस्तानने जम्मू आणि राजस्थानातील सतवारी, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि जैसलमेर इथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात भारतीय सैन्य दलाने हा हल्ला परतवून लावला होता.