पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात दररोज नवीन खुलासे होत आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत त्यांना ठार केले. 26 जणांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचं पहिल्या पासून भारताने सांगितलं होतं. आता तर ठोस पुरावाच हाती लागला आहे. तपासात असे समोर येत आहे की हल्ल्याच्या ठिकाणी असलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये लपलेल्या त्यांच्या म्होरक्यांना घटनेची प्रत्येक माहिती देत होते. दहशतवाद्यांकडे कॅमेरे आणि सॅटेलाइट फोन होते. ज्याच्या मदतीने ते थेट पाकिस्तानच्या संपर्कात होते. तपासादरम्यान असा दावा केला जात आहे की पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांकडून त्यांना हल्ल्याच्या सूचना मिळत होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, NIA च्या तपासात असे उघड झाले आहे की ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला ते 15 एप्रिल रोजीच पहलगाममध्ये पोहोचले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या लोकांकडून NIA ला हे देखील समजले आहे की दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पहलगाम व्यतिरिक्त आणखी तीन ठिकाणे होती. NIA च्या तपासात असेही समोर आले आहे की घटनेपूर्वी खोऱ्यात तीन सॅटेलाइट फोन वापरले गेले होते. असं ही समोर येत आहे की दहशतवादी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हल्ल्याच्या दोन दिवस आधीच पोहोचले होते.या दहशतवाद्यांनी एकाच वेळी आणखी तीन ठिकाणांची रेकी केली होती. मात्र, त्या तीन ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख असल्यामुळे दहशतवादी तेथे हल्ला करू शकले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, पहलगाम व्यतिरिक्त दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आरु व्हॅली, अम्युझमेंट पार्क आणि बेताब व्हॅली ही ठिकाणे देखील होती.
सॅटेलाइट फोन कसे काम करतो?
सॅटेलाइट फोन, ज्याला 'सॅटफोन' असेही म्हणतात, हा पारंपरिक मोबाइल नेटवर्कऐवजी थेट उपग्रहांशी संपर्क साधून कार्य करतो. यामुळे अशा ठिकाणी देखील संपर्क साधणे शक्य होते, जिथे मोबाइल टॉवर नसतात. जसे की समुद्र, जंगल, वाळवंट किंवा युद्धग्रस्त प्रदेशात याचा वापर केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती सॅटफोनवरून कॉल करते, तेव्हा त्याचे सिग्नल जमिनीवरील कोणत्याही टॉवरऐवजी थेट आकाशातील एका संपर्क उपग्रहाकडे जातात. हा उपग्रह त्या सिग्नलला संबंधित रिसीव्हरपर्यंत - दुसऱ्या फोनपर्यंत किंवा नेटवर्कपर्यंत - पोहोचवतो. यासाठी बहुतेक फोन LEO (लो अर्थ ऑर्बिट) किंवा GEO (जिओस्टेशनरी ऑर्बिट) उपग्रहांचा वापर करतात. GEO उपग्रह जास्त उंचीवर स्थिर असतात, तर LEO उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात आणि जलद प्रतिसाद देतात. सॅटेलाइट फोनचा वापर सैन्य दल, आपत्कालीन व्यवस्थापन संस्था, सागरी जहाजे आणि पर्वतारोहक करतात. याची सेवा महाग असते आणि काही देशांमध्ये विशिष्ट अटींवरच ती वापरण्याची परवानगी मिळते. याचा वापर अशा परिस्थितीत जीवनरक्षक ठरते, जिथे इतर सर्व संपर्क माध्यमे ठप्प होतात.
हाशिम मूसा घटनेतील मुख्य सूत्रधार
हाशिम मूसा पूर्वी पाकिस्तानच्या पॅरा मिलिट्रीमध्ये सामील होता. नंतर त्याला तेथून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तो भारतात प्रतिबंधित असलेल्या लष्कर-ए-तैयबा या संघटनेत सामील झाला. भारतीय सुरक्षा यंत्रणांचा असा विश्वास आहे की मूसा पाकिस्तानी सैन्याच्या सांगण्यावरून लष्करमध्ये सामील झाला होता. त्याला केवळ देखाव्यासाठी एसएसजीमधून काढण्यात आले होते. असा अंदाज आहे की, तो सप्टेंबर 2023 मध्ये सीमा ओलांडून भारतात आला होता. तो काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सक्रिय होता. त्याला काश्मीरमध्ये लष्करची संघटना मजबूत करण्याचे काम सोपवण्यात आले होते.
ट्रेंडिंग बातमी - Yavatmal Crime News : घराच्या हिस्से वाटणीवरून वाद, भावाने केली भावाची हत्या
मूसा एक प्रशिक्षित पॅरा कमांडो आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षित कमांडो अत्याधुनिक शस्त्रे चालवण्यात तरबेज असतात. मूसा अपरंपरागत युद्ध मोहिम चालवण्यासोबतच गुप्तचरगिरीच्या कामातही माहिर मानला जातो. सूत्रांनुसार, मूसाबद्दल ही माहिती पहलगाम हल्ल्यानंतर ताब्यात घेतलेल्या त्या 14 लोकांकडून मिळाली आहे, ज्यांची सुरक्षा यंत्रणांनी चौकशी केली आहे. या लोकांवर पहलगाम हल्ल्यात सामील असल्याचा संशय आहे. या लोकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांना आवश्यक वस्तू पुरवण्याचा आणि हल्ल्याच्या ठिकाणाची रेकी करण्याचा आरोप आहे.