इस्रायलमधील कैद्यांना ठेवण्यात आलेल्या छावणीत पॅलेस्टाईनच्या पुरुष कैद्यांचे इस्रायलच्या महिला सैनिकांनीही लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या छावणीत सुरू असलेल्या लैंगिक छळाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून टीका होऊ लागली आहे. N12 वर एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये एसडीई तेईमान छावणीत इस्रायलच्या सैनिकांद्वारे पॅलेस्टाईनच्या सैनिकांवर करण्यात येत असलेले अत्याचार दाखवण्यात आले आहेत. या केंद्रातील कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. या छावणीत कैद्यांचा रोज छळ करण्यात यायचा असा आरोप केला जात आहे.
लैंगिक अत्याचार आणि मारहाण
या छावणीतून पॅलेस्टाईनच्या इब्राहीम सालेम याची सुटका झाली आहे. त्याने या छावणीत ज्या यातना भोगल्या त्याबद्दल विस्ताराने सांगितले आहे. त्याने सांगितले की कैद्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात यायचे. कैद्यांना विजेचे झटके दिले जायचे आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात यायची. सालेम याने म्हटलंय की बहुतांश कैद्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात यायचे. या अत्याचारांमुळे त्यांना जखमा व्हायच्या. यातले बहुतांश कैदी हे त्यांच्यावर अत्याचार झालेत हे सांगण्याऐवजी त्यांना मूळव्याध झाल्याचे सांगत असे सालेमने म्हटलंय.
महिला सैनिकही करायच्या अत्याचार
सालेमने म्हटलंय की कैद्यांवर कधीकधी इस्रायलच्या महिला सैनिकही लैंगिक अत्याचार करायच्या सालेमला गाझातील कमाल अदवान रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आलं होतं. डिसेंबर 2023 मध्ये इस्रायली सैन्याने इथे छापेमारी केली होती. याच रुग्णालयात सालेमची मुलं-बाळंही उपचारासाठी आणण्यात आली होती. त्याचे भाऊ-बहीण हे त्यांच्या कुटुंबासह ठार झाले होते. सालेमला इथून इस्रायली सैनिक घेऊन गेले. त्यांनी सालेमला नग्न करून इतरांसह एका मोठ्या खड्ड्यात ठेवलं होतं. सगळ्या कैद्यांचे हात-पाय बांधण्यात आले होते. इथूनच त्यांच्यावर अत्याचाराला सुरुवात झाली होती. सालेम हा 52 दिवस इस्रायली सैन्याच्या ताब्यात होता. हे 52 दिवस आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस होते असे त्याचे म्हणणे आहे.