Pan Masala Draft Rule: पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकार एक मोठे कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही पान मसाला किंवा गुटखा खात असाल, तर लवकरच तुम्हाला या उत्पादनांच्या पॅकेजिंगमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने या उत्पादनांच्या प्लास्टिक पॅकेजिंगवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता लहान प्लास्टिक पाकिटांवर (Sachets) पूर्णपणे बंदी येऊ शकते. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने या दिशेने 'खाद्य सुरक्षा आणि मानक (पॅकेजिंग) सुधारणा नियम, 2026' चा मसुदा (Draft) जारी केला आहे. या नवीन बदलाचा थेट फटका पान मसाला आणि तंबाखू उद्योगाला बसणार आहे, कारण सरकार आता या उत्पादनांसाठी प्लास्टिकचा वापर मुळापासून नष्ट करू इच्छित आहे.
(नक्की वाचा: LPG News: तुम्ही घरी LPG सिलिंडर वापरता? 1 मेपासून बदलणार नियम, बुकिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंत होणार मोठे बदल)
प्लास्टिक आणि अॅल्युमिनियम फॉइलवर पूर्ण बंदी
नवीन मसुद्यानुसार पान मसाला आणि गुटखा यासारखे प्रोडक्ट आता कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिक पाकिटात किंवा सॅशेमध्ये विकता येणार नाहीत. सरकारचा दृष्टिकोन या बाबतीत अत्यंत कडक आहे. मसुद्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, पॅकेजिंगसाठी प्लास्टिक, पॉलिथिन किंवा पीव्हीसी (PVC) यासारख्या कोणत्याही सिंथेटिक साहित्याचा वापर वर्ज्य असेल. इतकेच नाही तर जी उत्पादने अनेकदा अॅल्युमिनियम फॉइलच्या चमकदार पॅकिंगमध्ये मिळतात, त्यावरही बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे हे निर्बंध केवळ विक्रीपुरते मर्यादित नाहीत. मसुद्यानुसार या उत्पादनांची पॅकिंग, साठवणूक (Storage) आणि वितरण यामध्येही कोणत्याही स्वरूपात प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही. प्लास्टिकची छोटी पाकिटे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही घातक असल्याचे सरकारचे मत आहे.
(नक्की वाचा: Startup Success Story: 24 वर्षांच्या तरुणाने नोकरी सोडून सुरू केला स्टार्टअप, 4 महिन्यांतच कमावले 1 कोटी रुपये)
पॅकेजिंगसाठी पर्यायी नैसर्गिक साहित्य
प्लास्टिकवर बंदी आल्यास ही उत्पादने कशा पद्धतीने विकली जातील, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी सरकारने नैसर्गिक आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या (Recyclable) साहित्याचा पर्याय दिला आहे. आता पान मसाला कंपन्यांना पेपर, पेपर बोर्ड किंवा सेल्युलोज यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करावा लागेल. याव्यतिरिक्त टिन कंटेनर (Tin containers) आणि काचेच्या बाटल्या किंवा डब्यांच्या वापरास परवानगी दिली जाऊ शकते. या बदलाचा मुख्य उद्देश पर्यावरणाची होणारी मोठी हानी रोखणे हा आहे. पान मसाला आणि तंबाखूची छोटी प्लास्टिक पाकिटे अनेकदा गटारे आणि रस्त्यांवर कचऱ्याचा डोंगर निर्माण करतात, ज्यांची विल्हेवाट लावणे अशक्य असते. नैसर्गिक साहित्याचा वापर केल्यास हा कचरा कमी होण्यास मदत होईल.

Photo Credit: NDTV Marathi
जनता आणि स्टेकहोल्डर्सकडून सूचना मागवल्याFSSAIने हा मसुदा सार्वजनिक केला असून पुढील 30 दिवसांच्या आत सामान्य जनता आणि उद्योगाशी संबंधित स्टेकहोल्डर्सकडून सूचना मागवल्या आहेत. या 30 दिवसांत प्राप्त होणाऱ्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतरच सरकार अंतिम निर्णय घेईल आणि त्याचे कायद्यात रूपांतर करेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world