Pandit Nehru Letters controversy : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या पत्रानं नवा वाद सुरु झाला आहे. सोमवारी संसदेमध्येही हा मुद्दा गाजला. या प्रकरणावरुन काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपानं केला. या पत्रामध्ये असं काय आहे? ते देशाला माहिती व्हावं ही गांधी परिवाराची इच्छा नाही? असा प्रश्न भाजपा खासदार संबित पात्रा यांनी विचारला. पंडित नेहरु यांनी एडविना माऊंटबॅटन आणि अन्य व्यक्तींना काय लिहिलंय जे लपवण्याचा प्रयत्न होतोय, असा प्रश्न भाजपानं विचालाय.
पंतप्रधान संग्रहालय आणि पुस्तकालय (PMML) सोसायटीचे सदस्य रिझवान कादरी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहलं आहे. त्यानंतर हे प्रकरण उघड झालं. या पत्रामध्ये कादरी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची पत्रं परत मागितली आहेत. ही पत्र कथितपणे 2008 साली सोनिया गांधी यांना सोपवण्यात आली होती.
( नक्की वाचा : राज्यघटनेनुसार सरदार पटेल पंतप्रधान झाले असते, पण... मोदींनी सांगितलं तेव्हा काय झालं? )
नेहरुंनी कुणाला लिहिली होती पत्रं?
पंडित नेहरुंची 51 डबे भरुन खासगी पत्रं 2008 साली सोनिया गांधी यांना देण्यात आली होती. त्यावेळी केंद्रात यूपीए सरकार होते. पंतप्रधान संग्रहालय आणि पुस्तकालय (PMML) सोसायटीनं ही पत्रं दिली होती. माजी पंतप्रधानांच्या या पत्रांना ऐतिहासिक महत्त्व आहे. ती पत्रं कुणाची खासगी संपत्ती कशी असू शकते? असं मत पीएमएमएलनं व्यक्त केलंय. नेहरुंनी ही पत्र खालील व्यक्तींना लिहिली होती.
- एडविना माऊंटबॅटन (भारतामधील ब्रिटनचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या पत्नी)
- अल्बर्ट आईन्स्टाईन (जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ)
- जयप्रकाश नारायण (्स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय नेते)
- पद्मजा पंडित (स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय नेत्या)
- विजयालक्ष्मी पंडित ( पंडित नेहरु यांच्या बहीण)
- अरुणा असफ अली (स्वातंत्र्यसैनिक)
- बाबू जगजीवनराम (स्वातंत्र्यसैनिक, देशाचे पहिले दलित उपपंतप्रधान)
- गोविंद वल्लभ पंत ( स्वातंत्र्यसैनिक आणि उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री)
सोनिया गांधींकडं कशी पोहोचली पत्रं?
पंडित नेहरुंची ही पत्रं जवाहरलाल नेहरु मेमोरियलनं 1971 साली नेहरु मेमोरियल म्युझिम अँड लायब्रररीला दिली होती. या संस्थेला आता पंतप्रधान संग्रहालय आणि पुस्तकालय या नावानं ओळखलं जातं. ही सर्व कागदपत्रं मेमोरियलला दान देण्यात आले आहेत. याबाबतच्या माहितीनुसार पंडित नेहरुंची ही पत्रं आणि अन्य कागदपत्र कथितपणे 2008 साली सोनिया गांधी यांच्या निर्देशानंतर संग्रहालयातून बाहेर काढण्यात आले. ही सर्व पत्रं 51 डब्यात भरुन सोनिया गांधी यांच्या घरी पोहोचवण्यात आली होती.
( नक्की वाचा : PM Modi Speech : 'काँग्रेसनं वेळोवेळी संविधानाची शिकार केली', पंतप्रधानांनी सर्व इतिहासच सांगितला )
पत्रात लपवण्यासारखं काय?
भाजपा खासदार संबित पात्रा यांनी संसदेत या विषयावर प्रश्न उपस्थित केला. पंडित नेहरु यांची पत्र लपवली का जात आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. पंडित नेहरु यांनी माऊंटबॅटन यांच्या पत्नीला लिहिलेली पत्रं गायब करण्यात आली आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नेहरु आणि जयप्रकाश नारायण यांच्यात झालेली चर्चा ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती परत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. नेहरू यांनी एडविना माऊंटबॅटन यांना काय लिहलंय जे सेन्सॉर करण्याची गरज आहे, याची मला उत्सुकता आहे, असा टोला पात्रा यांनी काँग्रेसला लगावला.
सोनियांकडून मिळालं नाही उत्तर
इतिहासकार कादरी यांनी राहुल गांधी यांना हे पत्र लिहलंय. त्यामध्ये राहुल गांधी यांनी त्यांच्या आई (सोनिया गांधी) यांच्याशी बोलावं आणि नेहरुंची सर्व पत्रं जी देशाची संपत्ती आहे ती परत द्यावी अशी मागणी केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान कुणाशी बोलत होते, कोणत्या कागदपत्रांवर सही करत होते, हे जाणून घेण्याचा देशातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, असं त्यांनी सांगितलं. या विषयावर सोनिया गांधी यांनी कोणतंही उत्तर दिलं नसल्यानंच हे पत्र राहुल यांना लिहिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.