जाहिराती इतकाच माफीनामा मोठा आहे का? सर्वोच्च न्यायालयानं रामदेव बाबांना फटकारलं

पतंजली आयुर्वेदकडून त्यांच्या औषधाबद्दल देण्यात आलेल्या खोट्या दाव्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार, 23 एप्रिल) सुनावणी झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
पतंजली जाहिरात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
नवी दिल्ली:

पतंजली आयुर्वेदकडून त्यांच्या औषधाबद्दल देण्यात आलेल्या खोट्या दाव्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार, 23 एप्रिल) सुनावणी झाली.  या सुनावणीच्या दरम्यान कोर्टानं रामदेव यांना फटकारलं. त्याचबरोबर पंतजलीला पुन्हा एकदा माफीनामाची जाहीरात छापण्याचे आदेश दिले आहेत. रामदेव यांनी कोर्टानं फटकारल्यानंतर पुन्हा एकदा जाहिरात प्रकाशित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयानं हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रकरणात आता 30 एप्रिल रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. 

कोर्टात काय झालं?

रामदेव यांचे वकील मुकूल रोहतगी यांनी आम्ही माफीनामा सादर केल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यावर न्या. हिमा कोहली यांनी माफीनामा काल का सादर केला? अशी विचारणा केली. आम्ही आता हे गठ्ठे पाहू शकत नाही. हा माफीनामा यापूर्वीच सादर व्हायला हवा होता, असं कोहली यांनी सुनावलं. 

हा माफीनामा कुठं प्रसिद्ध झालाय? असा प्रश्न न्या. अमानुल्लाह यांनी विचारला. त्यावर आम्ही 67 वृत्तपत्रामंमध्ये हा माफीनामा प्रसिद्ध केलाय अशी माहिती रोहतगी यांनी दिली. त्यावर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती इतकाच माफीनामा आहे का? असा प्रश्न न्या. कोहली यांनी विचारला. त्यावर रामदेव यांच्या वकिलांनी नाही, असं उत्तर दिलं. तसंच यावर 10 लाख रुपये खर्च केले असल्याचं स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : बाबा रामदेव यांच्या अडचणी कायम, सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा फेटाळली विनंती )

काय आहे प्रकरण?

पतंजली आयुर्वेदाची उत्पादनं आणि उपचारांच्या प्रभावाबाबतच्या जाहिरातीसंबंधी अवमानना याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात न्यायालयानं योग गुरु रामदेव आणि कंपनीचे प्रबंध संचालक आचार्य बालकृष्ण यांना मंगळवारी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्या. हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठानं कंपनी आणि बालकृष्ण यांनी कोर्टानं यापूर्वी दिलेल्या नोटिसींवर उत्तर दाखल न केल्याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. या प्रकरणात कोर्टानं दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का करु नये अशी विचारणा त्यांनी केली होती. 

Advertisement

सर्वोच्च न्यायालयात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नं दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी सुनावणी सुरु होती. त्यामध्ये रामदेव यांनी कोव्हिड लसीकरण अभियान आणि आधुनिक औषधांच्या विरोधात मोहीम चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे.