NDTV World Summit 2025: दहशतवादासमोर 'गप्प बसणाऱ्या भारताचा' काळ संपला असून, आता देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना 'जशास तसे उत्तर' दिले जाते, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. NDTV वर्ल्ड समिट 2025 मध्ये बोलताना पंतप्रधानांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा (Operation Sindoor) उल्लेख केला. सीमापार दहशतवादाबद्दल भारताची निर्णायक भूमिका अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हे उदाहरण दिले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "आताचा आत्मनिर्भर भारत (Self-Reliant India) शांत बसत नाही. तो सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strikes), एअर स्ट्राइक (Airstrikes) आणि ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) माध्यमातून जशास तसे उत्तर देतो," त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
'ऑपरेशन सिंदूर' आणि भारताची निर्णायक कारवाई
भारताच्या सीमापार लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानसोबत (Pakistan) वाढलेल्या तणावाच्या काही आठवड्यांनंतर पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे. 7 मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करत समन्वित हल्ले केले.
( नक्की वाचा : Pak-Afghan Conflict : पाकिस्तानचा 'काळ' अफगाणिस्तानात! 'या' दहशतवादी नेत्यामुळेच सुरु झाले दोन्ही देशात युद्ध )
भारतीय हवाई दल (Indian Air Force) आणि भारतीय सैन्य (Indian Army) यांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन केले. यात लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba), जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि हिजबुल मुजाहिदीन (Hizbul Mujahideen) या दहशतवादी गटांशी संबंधित तळांवर स्टँड-ऑफ प्रिसिजन क्षेपणास्त्रांचा (Stand-off Precision Missiles) वापर करून त्यांना उद्ध्वस्त करण्यात आले.
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे प्रत्युत्तर दिले. या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानस्थित तीन दहशतवादी गटांशी संबंधित 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.