मला आईची आठवण झाली! पंतप्रधान मोदींनी लिहिले नीरज चोप्राच्या आईला पत्र

मंगळवारी जमैकाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी आयोजित जेवणाच्या कार्यक्रमास ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) देखील उपस्थित होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्‍ली:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका आईला पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी 'प्रसादा'साठी आभार मानले आहेत.  हा प्रसाद मिळाल्याने मला फार समाधान लाभले असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा प्रसाद ग्रहण करताना मला आईची आठवण झाली असे म्हणत पंतप्रधानांनी भावूक उद्गार काढले.  मंगळवारी जमैकाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी आयोजित जेवणाच्या कार्यक्रमास ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) देखील उपस्थित होता. नीरज याने पंतप्रधान मोदींना आईने बनवलेला चुरमा खाऊ घातला. तो खाल्ल्यानंतर पंतप्रधानांनी नीरजच्या आईला पत्र लिहिले आहे. 

पंतप्रधानांनी पत्रात म्हटले आहे की , "काल जमैकाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले असताना आयोजित करण्यात आलेल्या भोजनाच्या कार्यक्रमात नीरजची भेट झाली. चर्चेदरम्यान मला जेव्हा त्याने तुम्ही बनवलेला स्वादीष्ट चुरमा दिला तेव्हा मला अत्यानंद झाला."

आईची आठवण झाली

पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  "आज हा चुरमा खाल्ल्यानंतर मी तुम्हाला पत्र लिहिण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. भाऊ नीरज माझ्यासोबत या चुरमाविषयी अनेकदा बोलतो, पण आज हा चुरमा खाल्ल्यानंतर मी भावूक झालो. ही भेट तुमच्या अपार प्रेमाने भरलेली आहे आणि या स्नेहामुळे मला माझ्या आईची आठवण झाली. "

आई हे शक्ती, आपुलकी आणि समर्पणाचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी पत्रात म्हटलंय की, "हा योगायोग आहे की मला नवरात्रीच्या एक दिवस आधी आईकडून हा प्रसाद मिळाला आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये मी उपवास करतो. एक प्रकारे तुमचा हा चुरमा माझ्या उपवासाच्या आधी माझे जेवण बनले आहे."

Advertisement

देशसेवेसाठी आणखी बळ मिळाले 

पीएम मोदींनी पत्रात पुढे म्हटले आहे की,  ज्याप्रमाणे तुम्ही बनवलेले जेवण हे नीरजला देशासाठी पदक जिंकण्याची ऊर्जा देते, त्याचप्रमाणे हा चुरमा मला पुढील 9 दिवस देशसेवा करण्यासाठी शक्ती देत राहील.