निवडणुकीत अपेक्षित निकाल आला नाही तर...; प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला 

प्रत्येकवेळी काँग्रेसच्या अपयशामागे निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि मीडियासारख्या संस्था सरकारच्या अधीन असल्याचं कारण सांगणं योग्य नसल्याचं प्रशांत किशोर म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला दिला आहे. तसं प्रशांत किशोर यांनी गेल्या दहा वर्षात अनेक पक्षांना सल्ला दिला आणि जिंकवुनही दिलं. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी दिलेला सल्ला सर्वसाधारणपणे कोणताही राजकीय नेता दुर्लक्षित करीत नाही. 

प्रशांत किशोर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, राहुल गांधी हे सर्व व्यावहारिक हेतूंसाठी, आपला पक्ष चालवत आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी पक्षासाठी अपेक्षित परिणाम दिलेला नसतानाही ते स्वत:ही बाजूला हटत नाहीत आणि कुणाला पुढे येऊ देत नाहीत. प्रशांत किशोर पुढे म्हणाले, माझ्यासाठी ही बाब देखील लोकशाहीविरोधी आहे. त्यांनी विरोधी पक्षांना पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी एक योजना तयार केली होती, मात्र त्यांची रणनीती प्रत्यक्षात उतरण्यापूर्वीच त्यांच्या आणि काँग्रेस नेतृत्वामध्ये मतभेद झाल्याने ते वेगळे झाले. 

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधींचे राजकारणापासून दूर राहणे आणि 1991 मध्ये पीव्ही नरसिंहराव यांनी कार्यकाळ हाती घेतल्याची आठवण करीत ते म्हणाले, जर आपण एकच गोष्ट गेल्या दहा वर्षांपासून करीत आहात आणि त्यात यश मिळत नसेल तर एक ब्रेक घेणं चुकीचं नाही. पाच वर्षांसाठी ही जबाबदारी कुणा दुसऱ्याला सोपवा, सोनिया गांधीनीही हेच केलं आहे. 

चांगल्या नेत्याला आपल्या कमतरता माहिती असतात...
पीके पुढे म्हणाले, जगभरातील चांगल्या नेत्यांमध्ये एक गोष्ट खास असते, त्यांच्यात काय कमी आहे हे त्यांना निश्चित माहिती असतं, याशिवाय ती कमतरता दूर करण्यासाठी ते तत्पर असतात. मात्र राहुल गांधींनी वाटतं की, त्यांना सर्व माहिती आहे. जर तुम्हाला कोणाच्याही मदतीची आवश्यकता वाटत नसेल तर कोणीच तुमची मदत करू शकत नाही. त्यांना ते स्वत:च योग्य वाटतात आणि जी व्यक्ती त्यांच्या विचारांना मूर्त रूप देऊ शकेल अशाच व्यक्तीची त्यांना गरज वाटते, मात्र हे शक्य नाही.  
 

2019 लोकसभेतील अपयशानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदावरुन राजीनामा दिला होता आणि काँग्रेसची जबाबदारी इतर व्यक्तीवर सोपविणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांनी जे लिहिलं त्याविरोधात काम केलं. काँग्रेसमध्ये निर्णय घेता येऊ  शकत नाही, असं अनेक काँग्रेस नेते खासगीत मान्य करतात. इतकच नाही तर युतीतील घटक पक्षांसोबतच्या जागांवरही 'एक्सवायझेड'कडून मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येऊ शकत नाही.   

प्रशांत किशोर

राजकीय रणनीतीकार

प्रत्येकवेळी काँग्रेसच्या अपयशामागे निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि मीडियासारख्या संस्था सरकारच्या अधीन असल्याचं कारण सांगणं योग्य नसल्याचं प्रशांत किशोर म्हणाले. काही अंशी ही बाब खरी असू शकते, मात्र हे संपूर्ण सत्य नाही. 2014 च्या लोकसभेत काँग्रेसच्या जागा 206 वरुन 44 पर्यंत घसरल्या. त्यावेळी ते सत्तेत होते. त्यावेळी भाजपचा विविध संस्थावर फारसं नियंत्रणही नव्हतं. पुढे ते म्हणाले, विरोध पक्षांच्या काम करण्याच्या पद्धतीत संरचनात्मक दोष आहेत आणि यश मिळविण्यासाठी त्यांना हे दोष दूर करण्याची आवश्यकता आहे. 

Advertisement