पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी Xवर पोस्ट करत रतन टाटा यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, "रतन टाटाजी एक दूरदृष्टी असणारे धडाडीचे उद्योगपती होते. मात्र त्याचवेळी ते कनवाळू आणि अत्यंत सहृदयी होते. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व प्रदान केले. बोर्डरूमपलीकडे जात त्यांनी समाजासाठी योगदान दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनविण्याप्रती त्यांची अतूट बांधिलकी होती."
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, "रतन टाटाजी यांच्या सर्वात अनोख्या पैलूंपैकी एक म्हणजे मोठी स्वप्ने पाहण्याची आणि समाजाचे देणे परत करण्याची त्यांची आवड. शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छता, प्राणी कल्याण यासारख्या अनेक गोष्टींसाठी ते सतत प्रयत्नशील होते."
पंतप्रधानांनी टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हटले की, "रतन टाटा जी यांच्याशी अनेकदा संवाद साधला, त्या आठवणींनी मन भरून आले. मी मुख्यमंत्री असताना आमची गुजरातमध्ये अनेकदा भेट होत असे. आम्ही विविध मुद्द्यांवर बोलायचो. त्यांचा दृष्टीकोन खूप समृद्ध होता असे मला वाटत असे. मी दिल्लीत आलो तेव्हाही आमच्यातील संवाद सुरूच राहीला. त्यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे ओम शांती."